
तिरुवनंतपुरम: वेल्लारडा येथील एका बिव्हरेज आऊटलेटमधून (वाईन शॉप) दारूचा बॉक्स चोरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजयकुमार (४०, रा. पेरुंकुन्नम) आणि एबिन (३१, रा. अमराविला) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.
या दोघांनी आधी वेल्लारडा बिव्हरेजेस मधून अर्धा लिटर विदेशी दारू विकत घेतली. ती प्यायल्यानंतर ते पुन्हा दारू घेण्यासाठी दुकानावर आले. त्यावेळी दुकानात दारूचा नवीन साठा आला होता आणि गाडीतून माल उतरवण्याची लगबग सुरू होती. कामगार गाडीतून दारूचे बॉक्स खाली ठेवून मग ते दुकानात नेत होते. हीच संधी साधून या दोघांनी कामगार आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवली आणि विदेशी दारूने भरलेला एक अख्खा बॉक्स घेऊन तिथून पोबारा केला.
या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या आरोपींचा शोध घेत त्यांच्या अड्ड्यावर छापा टाकला, तेव्हा हे महाभाग आपल्या मित्रांसोबत ती चोरलेली दारू संपवण्याच्या तयारीत होते. सर्कल इन्स्पेक्टर श्रीकुमार, पीएसआय मनोज आणि पोलीस कॉन्स्टेबल अखिलेश, दीपू, दुनिश यांच्या पथकाने या दोघांना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.