रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. बेडरोल स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी (Train passenger) आणखी एक आनंदाची बातमी आहे. आता एसी कोचमधील (AC coach) बेडशीट स्वच्छ नसल्यामुळे तुमच्यासोबत बेडशीट घेऊन जाण्याची गरज नाही. रेल्वे विभागाने (Railway Department) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रेल्वे प्रवासी, एसी कोचमध्ये स्वच्छ बेडरोल (Bedroll) मिळवणार आहेत. यापूर्वी रेल्वेच्या एसी कोचमध्ये मिळणाऱ्या बेडरोल महिन्यातून एकदा धुतले जात होते. आता मात्र १५ दिवसांतून एकदा बेडरोल धुण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
बेडशीट आणि उशीच्या कव्हर्सच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. चादरी घाणेरड्या असल्याने त्यांचा वापर करणे कठीण असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी अनेक वेळा केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत रेल्वे विभागाने आता १५ दिवसांतून एकदा बेडशीट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी लोकसभेत रेल्वेच्या एसी कोचमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेडरोल महिन्यातून एकदा धुतल्या जातात, अशी माहिती दिली होती. यामुळे रेल्वे विभागावर बरीच टीका झाली होती. महिन्यातून एकदा बेडशीट स्वच्छ केल्या तर किती लोक त्याचा वापर करतात, बेडरोल स्वच्छ कसे राहू शकतात, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला होता. यामुळे प्रवाशांचे आरोग्य बिघडते, असे मतही व्यक्त केले जात होते. या टीकेनंतर रेल्वे मंत्रालयाने हा ठोस निर्णय घेतला आहे.
१५ दिवसांतून एकदा बेडशीट, उशीचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी रेल्वे विभागाने गुवाहाटीच्या रेल्वे लाँड्रीमध्ये काम सुरू केले आहे. विभागाने सांगितल्याप्रमाणे काम झाल्यास प्रवाशांना स्वच्छ चादरी मिळतील. त्यांना आरामात प्रवास करता येईल. भारतीय रेल्वेच्या एसी कोच प्रवाशांना बेडरोल सुविधा दिली जाते. यामध्ये दोन चादरी, एक रग, उशी आणि एक छोटा टॉवेल दिला जातो. यासाठी रेल्वे अतिरिक्त पैसे घेत नाही. मात्र गरीब रथ रेल्वेमध्ये बेडरोलसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
गुवाहाटीच्या रेल्वे लाँड्रीमध्ये रग आणि बेडशीट जलद गतीने स्वच्छ केले जातात. एक चादर स्वच्छ करण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. चादरी प्रथम ८० ते ९० डिग्री तापमानात धुतली जाते. नंतर ती वाळवली जाते. एक बेडरोल स्वच्छ करण्यासाठी सुमारे २३.५८ रुपये खर्च येतो, असा अंदाज आहे. दररोज बेडरोल स्वच्छ केले जात आहेत, असे गुवाहाटी कोचिंग डेपो मॅनेजर सुदर्शन भारद्वाज यांनी सांगितले. एक बेडशीट स्वच्छ करण्यासाठी सुमारे ४५ ते ६० मिनिटे लागतात, अशी माहिती भारद्वाज यांनी दिली. या कामासाठी मोठ्या प्रमाणात महिलांना कामावर घेतले आहे. ६० टक्के महिला काम करत असून, महिला सक्षमीकरणाला यामुळे मदत होत आहे.