तिरुपतीच्या लाडूत 250 कोटींचा घोटाळा, एक थेंबही दूध न वापरता 68 लाख किलो तुपाचा पुरवठा!

Published : Nov 12, 2025, 10:01 AM IST
Tirupati Temple Ghee Scam 250 Crore Fraud

सार

Tirupati Temple Ghee Scam 250 Crore Fraud : भेसळ आढळूनही बनावट तुपाचा पुरवठा करण्यास परवानगी दिली. SIT ने नेल्लोर न्यायालयात रिमांड अहवाल सादर केला. अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Tirupati Temple Ghee Scam 250 Crore Fraud :  2019-24 या काळात तिरुपतीमध्ये 250 कोटी रुपयांचा तूप घोटाळा झाला. बनावट तुपाचा पुरवठा उत्तराखंडमधील कंपनीने केला होता. भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क भगवानपूरमध्ये कार्यरत होती. प्रसादासाठीचे तूप पामतेल वापरून तयार केले जात होते. त्यात बीटा कॅरोटीन, ॲसेटिक ॲसिडसारखी रसायनेही मिसळली होती. एसआयटीने नेल्लोर न्यायालयात रिमांड अहवाल सादर केला आहे. 

या घोटाळ्यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून, तपास तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. भेसळ आढळूनही बनावट तुपाचा पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली. इतर कंपन्यांच्या नावाखाली होणाऱ्या तूप पुरवठ्याकडे दुर्लक्ष केले. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीआय तपासात धक्कादायक माहिती

तिरुपती लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष तपास पथकाने काही धक्कादायक तपशील उघड केले आहेत. या प्रकरणात ए-१६ अजय कुमार सुगंधी याला अटक करण्यात आली, जो भोले बाबा ऑर्गेनिक डेअरीला विविध रसायने पुरवत होता. तिरुमला तिरुपती देवस्थानाने लाडू प्रसादासाठी तूप पुरवण्याचा ठेका याच डेअरीला दिला होता.

सीआयटीने नेल्लोर एसीबी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात अनेक विस्मयकारक खुलासे केले आहेत. तपासानुसार, उत्तराखंडमधील भगवानपूर येथे डेअरीचे प्रमोटर पॉमिल जैन आणि विपिन जैन यांनी स्थापन केलेल्या भोले बाबा ऑर्गेनिक डेअरीने कधीही एक थेंब दूध किंवा लोणी खरेदी केले नाही, तरीही त्यांनी २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानाला ६८ लाख किलो तूप पुरवले.

'भोले बाबा डेअरी'चा संपूर्ण 'मोडस ऑपरेंडी'

तपासादरम्यान, एसआयटीने भोले बाबा डेअरीच्या प्रमोटरांनी अवलंबलेला संपूर्ण 'मोडस ऑपरेंडी' उलगडला आहे. डेअरी युनिटच्या नावाखाली, या प्रमोटरांनी एक संपूर्ण बनावट देशी तूप उत्पादन युनिट स्थापन केले आणि सुमारे २५० कोटी रुपये किमतीचे ६८ लाख किलो भेसळयुक्त तूप तिरुपती ट्रस्टला पुरवण्यात यशस्वी झाले.

बनावट कागदपत्रे: तपासणीत उघड झाले की भोले बाबा डेअरीच्या प्रमोटरांनी दुधाच्या खरेदीचे आणि देयकांचे बनावट रेकॉर्ड तयार केले. तथापि, स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांशी केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले की दुधाची खरेदी कधीच झाली नव्हती.

पाम तेल खरेदी: पॉमिल जैन आणि विपिन जैन यांनी जवळचे एक बंद पडलेले डेअरी युनिट विकत घेतले आणि त्याचे नाव 'हर्ष फ्रेश डेअरी' असे ठेवले. या युनिटच्या नावाखाली, त्यांनी दिल्लीस्थित 'बजेस अँड बजेस' कंपनीकडून (मलेशियातून पाम तेल आयात करणारी मोठी कंपनी) मोठ्या प्रमाणात पाम तेल आणि पाम कर्नल तेल खरेदी केले.

रसायनांचा वापर: त्यांनी अजय कुमार सुगंधी आणि दिल्लीस्थित 'अरिस्टो केमिकल्स' सारख्या पुरवठादारांकडून मोनोडिग्लिसराइड्स, ॲसेटिक ॲसिड एस्टर, लॅक्टिक ॲसिड, बीटा कॅरोटीन आणि कृत्रिम तूप इसेन्स यांसारखी विविध रसायनेही मिळवली.

भेसळयुक्त तुपाचे व्यावसायिक उत्पादन

हर्ष फ्रेश डेअरीतून पाम तेल, पाम कर्नल तेल आणि इतर रसायने बॅचमध्ये भोले बाबा मुख्य प्लांटमध्ये हलवली जात असत. या मुख्य प्लांटमध्येच भोले बाबा डेअरीच्या प्रमोटरांनी व्यावसायिक स्तरावर भेसळयुक्त तूप बनवण्याचे कार्य सुरू केले. अशा प्रकारे, त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिराच्या ट्रस्टला तब्बल पाच वर्षे यशस्वीरित्या फसवले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!