
नवी दिल्ली- तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा आज रविवारी ९० वर्षांचे झाले. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी दलाई लामा यांनी भावनिक संदेश देत पुढील ४० वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा हा संदेश एक्स वर पोस्ट करण्यात आला आहे.
दलाई लामा यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त म्हटले, "या विशेष दिवशी मला असे वाटते की तिबेटसह जगातील अनेक भागांतील माझे मित्र आणि शुभचिंतक माझा वाढदिवस साजरा करत आहेत. मी स्वतःला फक्त एक बौद्ध भिक्षू मानतो आणि सामान्यतः वाढदिवस साजरा करत नाही. पण जेव्हा तुम्ही सर्वांनी एवढे प्रेम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तेव्हा मलाही काही शब्द नक्कीच बोलायला हवेत."
ते म्हणाले की प्रसिद्धी मिळवणे चांगली गोष्ट आहे, पण खऱ्या आयुष्याचा आनंद शांतता आणि मनाच्या समाधानात आहे. दलाई लामा पुढे म्हणाले की ते मानवी मूल्ये आणि सर्व धर्मांमध्ये परस्पर सद्भाव वाढवण्यासाठी सतत काम करत राहतील. ते बुद्ध आणि शांतिदेव यांसारख्या महान भारतीय गुरूंच्या शिकवणीतून प्रेरणा घेतात.
दलाई लामा हसत म्हणाले, "मला आशा आहे की मी १३० वर्षे जगू शकेन." ते पुढे म्हणाले, "आम्ही आमचा देश गमावला आहे आणि भारतात निर्वासित आहोत, पण धर्मशाळेत राहून मी सर्व लोकांची आणि धर्मांची सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन."
दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया एक्स वर त्यांनी लिहिले, “मी १४० कोटी देशवासियांच्या वतीने दलाई लामा यांना ९० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ते प्रेम, करुणा, धैर्य आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक आहेत. आम्ही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.”