
Sunil Chhetri News: भारतीय फुटबॉलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री याला फिफाच्या दुसऱ्या 'प्लेयर इम्पॅक्ट प्रोग्राम' (FIFA Player Impact Program) मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमात सहभागी होणारा तो पहिला भारतीय पुरुष फुटबॉलपटू ठरला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी हा उपक्रम फक्त महिला फुटबॉलपटूंसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. पहिल्या सत्राच्या यशानंतर आता पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील 13 फुटबॉलपटूंचा समावेश असलेले दुसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यापैकी सुनीलसह 11 खेळाडूंनी जूनमध्ये अमेरिकेतील (USA) मॅसॅच्युसेट्स (Massachusetts) येथील बोस्टन (Boston) शहरात झालेल्या तीन दिवसीय 'इम्पॅक्ट ॲक्सिलरेटर वर्कशॉप'मध्ये सहभाग घेतला.
फुटबॉलपटूंनी त्यांची ओळख, सोशल मीडियावरील प्रभाव आणि इतर माध्यमांचा वापर करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावेत, हा फिफाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण, मानसिक आरोग्य आणि खेळात सर्वांना समान संधी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे खेळाडू काम करतील. सुनील व्यतिरिक्त स्पेनची विश्वचषक विजेती अलेक्सिया पुतेयास, कॅनडाची जेसी फ्लेमिंग, इंग्लंडची मिशेल अगीमांग, नायजेरियाची रशीदात अजिबदे आणि ब्राझीलची गॅबी नून्स यांसारखे स्टार खेळाडू या आंतरराष्ट्रीय यादीत आहेत.
फिफाच्या या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल सुनीलने आनंद व्यक्त केला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सुनील म्हणाला, 'ही संधी मिळाल्याने मी खूप खूश आहे. येथे जे काही शिकलो ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी उत्सुक आहे. मला वाटत नाही की येथे पुरुष आणि महिलांमध्ये काही फरक आहे. आम्ही विविध देशांतील अप्रतिम व्यक्तिमत्त्वे आणि जागतिक दर्जाच्या फुटबॉलपटूंसोबत आलो आहोत.' बोस्टनमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या कार्यशाळेत फुटबॉलपटूंनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि कोणत्या सामाजिक समस्यांवर काम करायचे आहे यावर चर्चा केली. गटचर्चा, प्रात्यक्षिके आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग शोधले.