
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 'Belonging: A Journey of Love' या त्यांच्या नवीन पुस्तकात एका अत्यंत वैयक्तिक घटनेचा खुलासा केला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या पहिल्या बाळाचा जन्म आणि काही तासांतच झालेला मृत्यू याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. राहुल गांधींच्या जन्माच्या वर्षभरापूर्वी या बाळाचा जन्म झाला होता, पण ते काही तासच जगले. सोनिया गांधींनी कुटुंबाचा भावनिक प्रवास, गरोदरपणातील आनंद, अचानक घडलेली दुर्घटना आणि त्यानंतरचे दुःख यावर प्रकाश टाकला आहे.
त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या प्रतिक्रियेची आणि या दुःखाच्या काळात त्यांनी दिलेल्या आधाराची आठवण सांगितली आहे. गांधी कुटुंबाच्या आयुष्यातील हा प्रसंग आजवर सार्वजनिक चर्चेपासून दूर राहिला होता.
सोनिया गांधींनी लिहिले आहे की, ही दुःखद घटना जानेवारी १९६९ मध्ये घडली. गरोदरपणाची बातमी समजल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. इंदिरा गांधी, ज्या सहसा आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त करत नसत, त्यांनी ही बातमी ऐकल्यावर खूप प्रेमाने प्रतिक्रिया दिली होती.
त्या क्षणाची आठवण काढताना सोनिया गांधी लिहितात, इंदिरा गांधींनी मला मिठी मारली आणि म्हणाल्या, "एका मोठ्या बाळाला दुसरं बाळ होणार!"
पुस्तकात बाळाच्या आगमनाची उत्सुकता आणि त्याभोवतीच्या उत्साहाचे वर्णन केले आहे. बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर त्याचा पहिला रडण्याचा आवाज ऐकल्याचे सोनिया गांधींनी सांगितले.
"बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यावर मला त्याचा पहिला रडण्याचा आवाज आला. नंतर राजीव मला त्याला भेटायला घेऊन गेले. एक लहान, पूर्णपणे निरोगी मुलगा, दाट काळे केस आणि लांब, सडपातळ बोटे," असं त्या लिहितात.
"आम्ही लगेच त्याच्या प्रेमात पडलो," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
बाळाच्या जन्माचा आनंद फार काळ टिकला नाही. सोनिया गांधींनी सांगितल्यानुसार, डॉक्टरांनी आधीच राजीव गांधींना बाळाच्या जगण्याच्या शक्यतांबद्दल सावध केले होते.
बाळ केवळ काही तास जगले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दाम्पत्याला ही धक्कादायक बातमी समजली.
आपल्या प्रतिक्रियेची आठवण काढताना सोनिया गांधी लिहितात, "'नाही, हे शक्य नाही! का, का,' मी विचारत राहिले. आम्ही दोघेही धक्क्यात होतो आणि आमचं हृदय तुटलं होतं."
त्यांनी हेही सांगितलं की, राजीव गांधीही त्यांच्यासोबत रडले. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना भावना लपवण्याची शिकवण दिली गेली होती, तरीही त्यांना अश्रू अनावर झाले.
इंदिरा गांधी त्यावेळी दौऱ्यावर होत्या. ही दुर्घटना समजताच त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला आणि त्या तातडीने रुग्णालयात परतल्या.
"त्यांनी आम्हाला मिठी मारली, त्यांचे डोळे लाल आणि सुजलेले होते," सोनिया गांधींनी आठवण सांगताना म्हटले. माजी पंतप्रधान या दुःखी दाम्पत्यासोबत बसल्या आणि त्यानंतरच त्या नाईलाजाने आपल्या सरकारी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी परतल्या.
पुस्तकात बाळाच्या अंत्यसंस्काराविषयी कुटुंबाच्या भावनिक संघर्षाचीही माहिती दिली आहे. नवजात बाळाच्या शरीराची विल्हेवाट लावण्याविषयीच्या पारंपारिक पद्धतींबद्दल चर्चा ऐकून मला खूप त्रास झाल्याचे सोनिया गांधींनी लिहिले आहे. विशेषतः जेव्हा बाळाचे अवशेष नदीत सोडण्याचा पर्याय सुचवला गेला.
त्यांनी याला ठाम विरोध केला. आपला नकार सांगताना त्या म्हणाल्या, "'नाही,' मी हळू आवाजात म्हटले. 'काहीही झालं तरी मी माझ्या बाळाला नदीत टाकू देणार नाही.'"
या सूचनेमुळे त्यांना भारतात आल्यानंतरचा एक जुना भयानक प्रसंग आठवला. सोनिया गांधींना दिल्लीच्या ओखला बॅरेजजवळ एक मृतदेह अडकलेला दिसला होता. या अनुभवामुळे आपल्या बाळाला नदीत सोडण्याचा विचार त्यांना सहन झाला नाही.
अखेर कुटुंबाने बाळाला दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील फिरोज गांधींच्या फार्ममध्ये पुरण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधी आणि त्यांचे धाकटे भाऊ संजय गांधी यांनी गुलाबी बोगनवेलीच्या झुडपाखाली अंत्यसंस्कार केले.
या वेदनादायी निर्णयाची आठवण काढताना सोनिया गांधी लिहितात, “हा एक वेदनादायी आणि त्रासदायक पर्याय होता, पण दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जेव्हाही आम्ही तिथे जायचो, तेव्हा आम्ही तिथे थांबायचो आणि त्या जागेवर फूल ठेवायचो.”
त्या म्हणतात की या मृत्यूचा त्यांच्यावर कायमचा भावनिक परिणाम झाला. या घटनेनंतर अनेक महिने त्यांना दुःख आणि अपराधीपणाची भावना सतावत होती.
या पुस्तकात एका उजव्या विचारसरणीच्या प्रकाशनाने केलेल्या हल्ल्याचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये या बाळाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोनिया गांधींनी म्हटले आहे की, या प्रकाशनाच्या विधानांमुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला.
"त्या शब्दांच्या विषाने माझ्या हृदयावर ओरखडे ओढले. लोक इतके निर्दयी कसे असू शकतात?" असं त्या पुस्तकात म्हणतात.
त्यांनी या प्रसंगाला भारतातील त्यांच्या सुरुवातीच्या वर्षांतील प्रमुख वैयक्तिक शोकांतिका म्हटले आहे. त्यावेळी त्या राजकारणापासून खूप दूर होत्या.
सोनिया गांधींनी लिहिले आहे की त्या १९६९ च्या अखेरीस पुन्हा गरोदर राहिल्या. मात्र, पहिल्या बाळाला गमावल्यामुळे कुटुंबाचा दृष्टिकोन बदलला होता. दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर त्यांना आनंदापेक्षा जास्त चिंता सतावत होती.
अखेर १९ जून १९७० रोजी राहुल गांधींचा जन्म झाला.
Belonging: A Journey of Love च्या माध्यमातून सोनिया गांधींनी त्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत वैयक्तिक घटनेची माहिती दिली आहे. हा प्रसंग आजवर सार्वजनिक चर्चेपासून दूर होता. भारतीय राजकारणात येण्यापूर्वी सोनिया आणि राजीव गांधी यांच्या भावनिक अनुभवांची झलक या पुस्तकातून मिळते.