
Sharjeel Imam Out on Interim Bail After 6 Years for Brothers Wedding: २०२० च्या दिल्ली दंगलीतील 'मोठ्या कटा'च्या प्रकरणातला आरोपी शरजील इमाम तब्बल सहा वर्षांनी तुरुंगाबाहेर आला आहे. आपल्या लहान भावाच्या, मुज्जम्मिल इमामच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी आणि आजारी आईला भेटण्यासाठी तो बिहारमधील काको या त्याच्या मूळ गावी पोहोचला आहे. दिल्लीच्या एका कोर्टाने त्याला १० दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
मुज्जम्मिल इमामचं लग्न २५ मार्चला होणार आहे. शरजील घरी आल्याने त्याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "सहा वर्षांनंतर आम्हाला ही संधी मिळाली आहे की शरजील भाई तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत... आम्ही कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी आमची अडचण समजून घेतली आणि त्याला दिल्लीहून बिहारला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी परवानगी दिली. त्याला ११ दिवसांसाठी, म्हणजे २० ते ३० तारखेपर्यंत पॅरोल मिळाला आहे. जामिनावर असलेल्या कोणत्याही अंडर-ट्रायल कैद्यावर ज्या सामान्य अटी घातल्या जातात, त्याच अटींनुसार त्याला सोडण्यात आलं आहे." पुढे, सरकारकडून तुमच्या काय मागण्या आहेत, असं विचारल्यावर तो म्हणाला, "आम्ही सरकारकडे काय मागणी करणार? आमच्या मागण्या न्यायव्यवस्थेकडून असतील. आमच्या मागण्या पूर्ण करणारी सरकार ही अधिकृत संस्था नाही. आमचा लढा धोरणांविरुद्ध आहे आणि त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आपल्या कोर्टांना आहे. आमचा कोर्टांवर विश्वास आहे. लवकरच आम्हाला नक्कीच न्याय मिळेल."
कडकड्डूमा कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांनी ९ मार्च रोजी शरजीलला जामीन मंजूर केला. २० मार्च ते ३० मार्च २०२६ पर्यंत त्याला अंतरिम जामिनावर सोडण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी त्याला ५०,००० रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेचे दोन जामीनदार देण्यास सांगण्यात आलं आहे. यासोबतच काही अटीही घालण्यात आल्या आहेत. कोर्टाने निर्देश दिले आहेत की, अंतरिम जामिनाच्या काळात शरजील या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही साक्षीदाराशी किंवा व्यक्तीशी संपर्क साधणार नाही. त्याला आपला मोबाईल नंबर तपास अधिकाऱ्याला द्यावा लागेल आणि तो चालू ठेवावा लागेल. तसेच, तो मीडियाशी बोलणार नाही किंवा सोशल मीडिया वापरणार नाही. त्याला फक्त कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची आणि आपल्या घरी किंवा लग्नाच्या ठिकाणीच राहण्याची परवानगी आहे. अंतरिम जामिनाचा कालावधी संपल्यानंतर शरजीलने ३० मार्चच्या संध्याकाळी तुरुंग अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण करावं आणि त्याचा अहवाल कोर्टात सादर करावा, असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.
स्वतःला 'राजकीय कैदी आणि विद्यार्थी कार्यकर्ता' म्हणवणारा शरजील जवळपास सहा वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. याआधी त्याला कधीही तात्पुरता जामीन मिळालेला नव्हता. अटकेच्या वेळी तो जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) मधून पीएचडी करत होता.
दिल्ली दंगल प्रकरणात शरजील इमाम, उमर खालिद आणि इतर १६ जणांना जानेवारी २०२० मध्ये बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायद्याच्या (UAPA) कडक कलमांखाली अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन प्रस्तावित नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही दंगल एक 'पूर्वनियोजित आणि सुनियोजित' कट होता. याआधी जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, आणि Mohd. सलीम खान आणि शादाब अहमद यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, कोर्टाने उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारला होता. फिर्यादी पक्षाचे आरोप आणि पुरावे या दोन्ही बाबतीत हे दोघे 'गुणात्मकदृष्ट्या वेगळ्या पातळीवर' आहेत, असं कोर्टाने म्हटलं होतं.