हैदराबाद : भगवान श्री सत्यसाई बाबांच्या शतकोत्तर जयंतीचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. इतिहासात नोंद राहील असा हा १०० दिवसांचा सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.
कर्नाटकमधील मुद्देनहळ्ळी सत्यसाई गाव, आंध्र प्रदेशच्या सीमेजवळ, भगवान श्री सत्यसाई बाबांच्या शतकोत्तर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. १६ ऑगस्ट ते २३ नोव्हेंबर या १०० दिवसांच्या कालावधीत, १०० देशांचे प्रतिनिधी, कलाकार आणि आध्यात्मिक नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. हा जागतिक सांस्कृतिक महोत्सव श्री मधुसूदन साई ग्लोबल ह्युमॅनिटेरियन मिशन आयोजित करत आहे.
25
प्रत्येक दिवशी एक देश - सांस्कृतिक वैभव
या १०० दिवसांच्या महोत्सवात प्रत्येक दिवस एका देशाला समर्पित असेल. त्या देशातील कलाकार नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. तसेच, त्या देशाच्या आध्यात्मिक जडणघडणीवर, इतिहास आणि परंपरांवर विशेष व्याख्याने होतील. दिवसाच्या शेवटी आध्यात्मिक गुरू सद्गुरू श्री मधुसूदन साई प्रवचन देतील. त्याच दिवशी त्या देशात सामाजिक कार्यात विशेष योगदान दिलेल्या व्यक्तीला ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्कार प्रदान केला जाईल.
35
आध्यात्मिक कार्यक्रम, यज्ञ, पूजा
शारन्नवरात्र उत्सवात अतिरुद्र महायज्ञ, दुर्गापूजा असे महत्त्वाचे आध्यात्मिक कार्यक्रम होतील. लाखो भाविक सहभागी होऊ शकतील असे हे यज्ञ, परंपरा जपत, भक्तीभाव वाढवतील.
नोव्हेंबर महिन्यात ६०० खाटांची क्षमता असलेल्या खाजगी मोफत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. येथे कोणतेही बिलिंग काउंटर नसेल. जात, धर्म, पंथ, आर्थिक स्थितीचा भेदभाव न करता कोणालाही मोफत वैद्यकीय उपचार मिळतील. हे आरोग्य क्षेत्रातच नव्हे तर सेवा क्षेत्रातही एक मैलाचा दगड ठरेल.
55
साई सिंफनी, धर्म शिखर परिषद
४० देशांतील ४०० संगीतकारांचा साई सिंफनी वर्ल्ड ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. यातील १७० संगीतकार सत्यसाई युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सलन्सचे विद्यार्थी आहेत हे विशेष. नोव्हेंबरमध्ये जागतिक धर्म शिखर परिषदही होणार आहे. यात विविध धर्मांचे आध्यात्मिक नेते शांतता, ऐक्य आणि सहनशीलतेवर आपले विचार मांडतील. २३ नोव्हेंबर रोजी भगवान श्री सत्यसाई बाबांच्या शतकोत्तर जयंती सोहळ्यानिमित्त हा महोत्सव संपेल.