
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर आणि नागरी भागांवर अनेक हल्ले करण्याचा प्रयत्न केला. क्षेपणास्त्र आणि ड्रोन सोडले. लढाऊ विमाने पाठवली. भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले निष्प्रभ केले. पाकिस्तानचे एक AWACS विमान आणि तीन लढाऊ विमाने मारून खाली पाडण्यात आली. या संपूर्ण घटनेत भारताच्या S-400 हवाई संरक्षण यंत्रणेने मोठी भूमिका बजावली. म्हणूनच त्याला सुदर्शन चक्र हे नाव मिळाले आहे.
S-400 हा जमिनीवरून हवेत लांब पल्ल्याचा क्षेपणास्त्र प्रणाली आहे. रशियाच्या अल्माज सेंट्रल डिझाईन ब्युरोने याची निर्मिती केली आहे. जगातली ही सर्वात प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा मानली जाते. ही यंत्रणा ६०० किमी अंतरावरील ड्रोन, विमाने, लढाऊ विमाने, स्टेल्थ विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे शोधू शकते आणि त्यांचा माग काढू शकते. ही यंत्रणा ४०० किमी अंतरावर मारा करू शकते.
प्रत्येक S-400 स्क्वॉड्रनमध्ये दोन बॅटरी असतात. एका बॅटरीमध्ये सहा लॉन्चर असतात. यासोबतच कमांड अँड कंट्रोल सिस्टम, निरीक्षण रडार आणि एंगेजमेंट रडार असतात. प्रत्येक बॅटरीजवळ १२८ क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज असतात.
भारताने २०१८ मध्ये रशियासोबत S-400 च्या पाच स्क्वॉड्रनसाठी करार केला होता. हा करार ३५ हजार कोटी रुपयांचा होता. भारताकडे सध्या S-400 च्या तीन स्क्वॉड्रन आहेत. त्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत.
S-400 द्वारे एका वेळी १६० लक्ष्यांवर लक्ष ठेवता येते. एका वेळी ७२ लक्ष्यांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता यात आहे. S-400 ची क्षेपणास्त्रे १७,००० किमी/तास वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखू शकतात. १० मीटर ते ३० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांना हवेतच नष्ट करण्याची ताकद यात आहे.
S-400 चे रडार आणि क्षेपणास्त्रे ट्रकवर लादलेली असतात. त्यामुळे त्यांना अवघड भूप्रदेशातही तैनात करता येते. S-400 प्रणाली तैनात करण्यासाठी कमी वेळ लागतो. फक्त ५ मिनिटांत ते काम सुरू करते. ज्या ट्रकवर S-400 बसवले आहे ते रस्त्यावर ६० किमी/तास आणि ऑफ-रोडवर २५ किमी/तास वेगाने धावू शकते.