
अजमेर : अजमेर रेल्वे स्टेशनवर धावती ट्रेन पकडण्याच्या नादात एका ३९ वर्षीय महिलेचा जीव जाता जाता वाचला. ट्रेनचा वेग वाढल्याने तिचा तोल गेला. ती ट्रेनसोबत फरफटत गेली आणि कोच अन् प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत पडली.
ट्रेन धावत होती आणि तिचं अर्धं शरीर त्या गॅपमध्ये अडकलं होतं. जवळच गस्त घालत असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या दोन जवानांची नजर तिच्यावर पडली आणि ते धावतच तिथे पोहोचले. त्यांनी सर्व ताकद लावून तिला पकडलं आणि प्लॅटफॉर्मवर खेचून काढलं.
या सगळ्या थराराला फक्त काही सेकंद लागले, पण त्यामुळे तिचा जीव वाचला. पाय घसरण्यापासून ते तिला सुखरूप बाहेर काढण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ही घटना १० नोव्हेंबरची आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यातील हुसेनपूर ख्वाबपूरमध्ये राहणारी रेश्मा (अहमद यांची पत्नी) असं या महिलेचं नाव आहे. ती बरेलीला चालली होती आणि त्यासाठी तिला ट्रेन पकडायची होती.
ट्रेन सुरू होताच ती ट्रेनसोबत धावली, तिने दरवाजाचं हँडल पकडलं आणि आत चढण्याचा प्रयत्न केला. पण तिचा तोल गेला आणि ती घसरली. ट्रेनच्या वेगामुळे ती फरफटत गेली आणि गॅपमध्ये जाऊन पडली.
हा व्हिडिओ ११ सेकंदांचा आहे. यात ती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना, खाली पडताना आणि त्यानंतर जवानांनी केलेल्या मदतीचा थरार दिसतो. सुरेंद्र आणि नरेंद्र कुमार हे दोन आरपीएफ जवान धावत्या ट्रेनजवळ पोहोचतात आणि तिला चाकाखाली जाण्याआधीच प्लॅटफॉर्मवर ओढून काढतात, हे यात स्पष्ट दिसतं. ती प्लॅटफॉर्मवर सुरक्षित आल्यानंतर तिथे प्रवाशांची मोठी गर्दी जमली.