
Celebrate Daughters Divorce : समाजात आजही घटस्फोटाकडे वाईट नजरेने पाहिलं जातं. पण या सगळ्याला छेद देणारी एक घटना मेरठमध्ये घडली आहे. एका निवृत्त न्यायाधीशांनी आपल्या घटस्फोटित मुलीचं घरी जंगी स्वागत केलं. बँड-बाजा लावून, नाचत-गात तिला घरी आणलं. 'घटस्फोट म्हणजे काही कलंक नाही' हा संदेश त्यांनी यातून दिला.
वकील ज्ञानेंद्र कुमार यांची मुलगी प्रणिता वशिष्ठ. तिचं लग्न 2018 मध्ये भारतीय सैन्यातील एका मेजरसोबत झालं होतं. पण लग्नानंतर काही वर्षांतच प्रणिताला सासरी मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास होऊ लागला. बाळ झाल्यानंतरही परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर तिने मेरठच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला.
शनिवारी कोर्टाने घटस्फोट मंजूर करताच, प्रणिता घरी परतली. तेव्हा तिच्या घरच्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, नाचत-गात तिचं स्वागत केलं. वडील ज्ञानेंद्र कुमार यांनी तर फुलांचा हार घालून तिचं स्वागत केलं आणि सगळ्यांना मिठाई वाटली.
ज्ञानेंद्र यांनी 'I love my daughter' असं लिहिलेलं काळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. ते म्हणाले, 'जर माझ्या मुलीचं वैवाहिक जीवन सुखी नसेल, तर तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे. मी कोणताही पोटगी न घेता तिला परत आणलं आहे. मुली म्हणजे काही मालमत्ता नाहीत. समाजापेक्षा त्यांच्या आनंदाला आणि सन्मानाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे.' घटस्फोटाकडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्याचा त्यांचा उद्देश आहे.