
बंगळूरू : गेल्या काही दिवसात पती पत्नीच्या वादाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने पतीसोबत येण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केली.
कर्नाटकातील नंजनगुड येथे, रुसून माहेरी गेलेल्या पत्नीने परत येण्यास नकार दिल्याने पतीने तिची मारहाण करून हत्या केली. सुधा (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती महेशला पोलिसांनी अटक केली आहे. नंजनगुडमधील कलाले येथील रहिवासी असलेली सुधा गेल्या दोन वर्षांपासून पती महेशपासून वेगळी राहत होती. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे आणि सततच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले होते. आपल्या मुलासोबत आणि आईसोबत राहणाऱ्या सुधाला महेशने अनेकदा परत बोलावले. त्रास देणार नाही, असे आश्वासनही दिले. मात्र, पतीच्या बोलण्यावर विश्वास नसल्याने सुधा परत गेली नाही.
आठवड्याभरापूर्वीही महेशने पत्नीला परत बोलावले होते, पण सुधा तयार झाली नाही. दरम्यान, आज सकाळी महेशने कलाले येथील सुधाच्या आईच्या घरी जाऊन वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि त्याने लाकडी दांडक्याने सुधाच्या डोक्यात वार केला. यात सुधाचा जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा ऐकून धावत आलेल्या स्थानिकांनी महेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महेशला अटक केली आहे. वडील आईला नेहमी मारहाण करायचे आणि दारू पिऊन भांडण करायचे, असा जबाब त्यांच्या मुलाने पोलिसांना दिला आहे. १३ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. सुधाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.