
श्रीनगर- २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांना कडक शिक्षा दिली. पाकिस्तानलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगरला पोहोचले.
श्रीनगरला पोहोचल्यानंतर त्यांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या मोर्टार आणि गोळ्यांचे पुरावे पाहिले. राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना त्यांच्या धर्माच्या नावावर मारले होते. आम्ही त्यांच्या वाईट कृत्यांचा हिशोब केला आणि त्यांना संपवले, हा आमचा धर्म आहे. पुढे ते म्हणाले की, त्यांनी धर्म पाहून निष्पापांची हत्या केली, हे पाकिस्तानचे कर्म होते. आम्ही त्यांच्या कर्मांना पाहून त्यांचा अंत केला, हा आमचा भारतीय धर्म होता.
संरक्षणमंत्र्यांनी जवानांशी भेट घेतली आणि आपल्या भाषणात त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, "अशा कठीण परिस्थितीत तुम्हाला भेटून मला अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही जे काम केले, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मी संरक्षणमंत्री असण्यापूर्वी एक भारतीय नागरिक आहे आणि त्याच नात्याने आज तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे."
पुढे ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर, दहशतवादाविरुद्ध भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या ३५-४० वर्षांपासून भारत सीमापार होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. पण आता भारताने जगाला हा स्पष्ट संदेश दिला आहे की, आम्ही दहशतवादाविरुद्ध कोणत्याही हद्दीपर्यंत जाण्यास तयार आहोत.