
नवी दिल्ली - पहलगाम येथील एप्रिल २२ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय माध्यम आणि प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. "भारत हा शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकरांसारख्या वीरांच्या परंपरेचा देश आहे. कोणीही येऊन आमच्या मातांचे ‘सिंदूर’ पुसू शकत नाही," असे म्हणत त्यांनी या कारवाईस योग्य आणि गरजेची ठरवले.
नवी दिल्लीत साहित्य अकादमीत आयोजित ‘द लोकमाता: लाईफ अँड लिगसी ऑफ देवी अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना आंबेकर म्हणाले, “आजचा भारत हा आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणारा राष्ट्र आहे. व्यापार महत्त्वाचा आहे, पण देशातील शांतता आणि एकता राखणंही तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर आवश्यक होतं.”
ते पुढे म्हणाले, “हे संदेश देणं गरजेचं होतं की, भारत हा शिवरायांचा देश आहे, जिथं अहिल्याबाईंसारख्या पराक्रमी स्त्रियांची परंपरा आहे. आमच्या देशात येऊन आमच्या मातांच्या कपाळावरचं सिंदूर कोणीही पुसू शकत नाही – ही गोष्ट जगाला समजणं गरजेचं आहे. हे नवे भारत आहे.”
७ मे रोजी भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्य साधून एक निर्णायक लष्करी कारवाई केली. जैश-ए-मोहम्मदच्या बव्हालपूर येथील बालेकिल्ला आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुरिदके येथील तळांवर प्रहार करण्यात आले. भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, यामध्ये युसुफ अझहर, अब्दुल मलीक रऊफ आणि मुदस्सिर अहमद यांसारखे ‘हाय-वॅल्यू टार्गेट्स’सह १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
भारत सरकारने ११ मे रोजी अधिकृतपणे सांगितले की, पाकिस्तानच्या उकसवणाऱ्या कारवायांचा – ज्यामध्ये ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रं आणि फायटर जेट्सचा वापर करून भारताच्या लष्करी आणि नागरी भागांवर लक्ष्य करण्यात आलं – प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.
या लष्करी कारवाईमुळे देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे भारताच्या सामरिक धोरणातील बदल स्पष्ट दिसून आला आहे. केवळ संरक्षणासाठी नव्हे तर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना ठोस इशारा देण्यासाठी भारत आता "प्रतिकारक" नव्हे तर "प्रत्युत्तरक" धोरण अवलंबत असल्याचे चित्र आहे.
सुनील आंबेकर यांनी या कार्यक्रमात देवी अहिल्याबाई होळकरांच्या कार्याचा गौरव करताना त्या केवळ एक शासिका नव्हत्या तर राष्ट्रनिर्मितीची दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या, असे सांगितले. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने पण निर्भीडपणे प्रशासन आणि सामाजिक सुधारणांचं नेतृत्व केलं, आणि आजच्या भारताला त्यांच्या विचारांची गरज आहे, असे ते म्हणाले.