
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी सोमवारी इंडिया आघाडीतील ज्येष्ठ खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत, सागरिका घोष आणि इतर काही खासदारांना ताब्यात घेतले. हे सर्व खासदार SIR विरोधात निषेध नोंदवत संसदेपासून भारत निवडणूक आयोगाकडे मोर्चा घेऊन निघाले होते.
मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी निषेधकांना रोखून ताब्यात घेतले. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “वास्तविकता अशी आहे की आम्हाला बोलू दिले जात नाही. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही, तर राज्यघटना वाचवण्यासाठी आहे. ‘एक व्यक्ती, एक मत’ हा लोकशाहीचा पाया आहे आणि त्याचे रक्षण करणे आवश्यक आहे.”
राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, देशाला स्वच्छ आणि शुद्ध मतदार यादीची गरज आहे. चुकीच्या नोंदी, बनावट मतदार आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाद्वारे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी केली. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर कुठल्याही प्रकारचा गदा येऊ नये आणि निवडणुका पूर्णपणे निष्पक्ष राहाव्यात.
या घटनेमुळे राजधानीत राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला आहे.