
पॅरिस: भारताच्या पीव्ही सिंधूला फ्रेंच ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. वर्ल्ड नंबर वन आणि गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या आन से यंगने अटीतटीच्या सामन्यात सिंधूचा २-१ असा पराभव केला. या सामन्याचा स्कोअर २१-१६, ११-२१, १२-२१ असा राहिला.
सिंधूने पहिल्या गेममध्ये २१-१६ अशी बाजी मारत सामन्यात महत्त्वाची आघाडी घेतली होती. पण आन से यंगने त्यानंतर जोरदार कमबॅक केलं आणि दुसरा गेम २१-११ असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. सिंधूने तिसऱ्या आणि निर्णायक गेमच्या सुरुवातीला ८-५ अशी आघाडी घेत आशा पल्लवित केल्या होत्या. पण आन से यंगने सलग ९ पॉईंट्स घेत १४-९ अशी मुसंडी मारली. आन से यंगने अखेर तिसरा गेम २१-१२ ने जिंकत फ्रेंच ओपनचं विजेतेपद कायम राखलं.
सिंधूने शनिवारी झालेल्या चुरशीच्या सेमीफायनलमध्ये जपानच्या हिना अकेचीचा (२१-१०, २०-२२, २१-१६) असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. सिंधूची या सीझनमधील ही दुसरी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५० फायनल होती. सिंधूने याआधी जुलैमध्ये झालेल्या जपान ओपनमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. कोरियन खेळाडू आन से यंगने दुसरीकडे जपानच्या नोझोमी ओकुहाराचा अवघ्या ४५ मिनिटांत (२१-१२, २१-१९) असा धुव्वा उडवत फायनलचं तिकीट कन्फर्म केलं होतं.