गावात राहणाऱ्या आणि इतर राज्यांतील लोकांशी विवाह करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना गावबंदीची शिक्षा दिली जाईल, असे ठरावात म्हटले आहे.
मानसा: पंजाबमधील मानसा येथील जवाहरके येथे इतर राज्यांतील कामगारांशी विवाह करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गावातील पंचायतीने इतर राज्यांतील लोकांशी विवाह करण्यास बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. गावात राहणाऱ्या आणि इतर राज्यांतील लोकांशी विवाह करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना गावबंदीची शिक्षा दिली जाईल, असे ठरावात म्हटले आहे.
२४ नोव्हेंबर रोजी मंजूर करण्यात आलेला हा ठराव ३० नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. मानसा येथील स्थानिक प्रशासनाला हा ठराव धक्कादायक वाटला. मानसाचे उपायुक्त कुलवंत सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, पंचायत सदस्यांना बोलवून ठरावात आवश्यक बदल केले जातील. असा ठराव मंजूर करण्याची आणि तो लागू करण्याची परवानगी कायद्याने दिली जात नाही, असेही कुलवंत सिंग यांनी स्पष्ट केले. ३५०० मतदार असलेल्या या गावात सुमारे ३०० स्थलांतरित राहतात.
गावच्या बाजारपेठेजवळ अनेक स्थलांतरित राहतात. यातील अनेकांनी गावातील मुलींशी विवाह केले आहेत. गावातील मुली गावाच्याच आहेत, या निरीक्षणातून हा ठराव मंजूर करण्यात आल्याचे पंचायत अध्यक्षाच्या पतीने स्थानिक माध्यमांना सांगितले. गावातील मुली गावातच राहाव्यात, यासाठी हा ठराव मंजूर करण्यात आल्याचे आणि सध्या हा ठराव चुकीच्या अर्थाने प्रसारित केला जात असल्याचे पंचायत अध्यक्षाचे पती रणवीर कौर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले.
पंजाबमधील स्थानिक गावांनी इतर राज्यांतील लोकांवर निर्बंध घातलेली ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मोहालीतील जंडपुरी येथे रात्री ९ नंतर इतर राज्यांतील लोकांना बाहेर पडण्यास बंदी घालणारे फलक लावण्यात आले होते. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे फलक काढून टाकण्यात आले. अशाच एका घटनेत खन्नाजवळील कौडी येथे इतर राज्यांतील लोकांना घर भाड्याने देणे, नोकरी देणे आणि जागा किंवा घर विकणे यावर बंदी घालण्यात आली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे बदलण्यात आले. अनेक ठिकाणी पंचायत निवडणुकीत इतर राज्यांतील लोकांनी उमेदवारी केल्याने स्थानिक नेत्यांनी अशी अमानवी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांतील लोक पंजाबमध्ये काम शोधण्यासाठी येतात.