
प्रयागराज - आजकाल प्रियकरासोबत (Boyfriend) जीवन जगण्यासाठी तरुणी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. त्यांना दुसऱ्या कुणासोबत राहणे प्रचंड अडचणीचे वाटते. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या काहीही करु शकतात. कुणाचा जीवही घेऊ शकतात.
एवढेच नव्हे तर प्रियकर नसला तरी लग्न झाल्यावर मुलगा चांगला आहे तरी अडचण, वाईट असला तरी अडचण. नवरा चांगला आहे, पण मला त्याच्यासारखा चांगला नवरा नको म्हणून एका तरुणीने लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत घटस्फोट घेतला. सोनम, ऐश्वर्याची गोष्ट वेगळीच आहे. त्यांनी घटस्फोटाचा विचार न करता थेट हत्येचा कट रचला आणि नवऱ्याचा खात्माच केला.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका तरुणाच्या बाबतीत असेच काही घडले. त्याचा जीव थोडक्यात वाचला म्हणून बरे.
कप्तान आणि सीतारा यांचे अरेंज्ड मॅरेज (Arranged Marriage) झाले होते. लग्नाआधी कप्तान खूप आनंदी होता. लग्नानंतर आयुष्य आणखी रंगतदार होईल असे त्याला वाटत होते. कप्तानच्या कुटुंबीयांनीही सीताराचे जोरदार स्वागत केले. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच कप्तानला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून अजूनही तो सावरलेला नाही. लग्नच का केले अशी त्याची अवस्था झाली आहे.
पहिली रात्र कशी होती?
पहिल्या रात्री (First Night) नववधू हातात दुधाचा ग्लास घेऊन येते. पण सीतारा हातात सूरा घेऊन आली. सुखी संसाराची स्वप्न पाहत असलेल्या कप्तानला सीताराचे वर्तन पाहून मोठा धक्काच बसला. नवरा जवळ येताच सीताराने सूरा दाखवला आणि जवळ आलास तर वाईट होईल. मला स्पर्श केलास तर तुझे ३५ तुकडे करेन अशी धमकीच दिली. त्यामुळे तो दुसरीकडे झोपला. ती अशी का वागली असा प्रश्न त्याला पडला होता. रात्रभर नीट झोप न लागलेल्या कप्तानला हनिमूनला जायचे तर सोडाच, घरात राहण्याचीही भीती वाटत होती. एकच नव्हे तर तब्बल तीन रात्री सीताराने अशीच धमकी देऊन कप्तानला दूर झोपायला लावले.
लग्न होऊन तीन दिवस झाले तरी सीतारा बदलली नाही. अखेर कप्तानने आपल्या आईला सर्व काही सांगितले. घरात यावर गंभीर चर्चा झाली. कप्तानचे कुटुंब आणि सीताराच्या कुटुंबात जोरदार वाद झाले. सीताराने कुठल्याही गोष्टीची पर्वा केली नाही. मी कप्तानवर प्रेम करत नाही. मला आधीच प्रियकर आहे. मला अमनसोबत पाठवा असे तिने कप्तानच्या घरच्यांना सांगितले.
प्रकरण तिथेच थांबले नाही. ते पोलीस ठाण्यात गेले. पंचायतही झाली. सीताराचे मन वळवण्यासाठी कप्तानसह त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण काहीच उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सीताराने एक मोठा कट रचला. रात्री सर्वजण झोपल्यानंतर भिंतीवरून उडी मारून प्रियकरासोबत पळून गेली. सीतारा पळून गेल्याने कप्तानला वाईट वाटले, पण जीव वाचला म्हणून त्याच्यासह त्याचे कुटुंबीय समाधानी होते.