
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की, त्यांना गुप्तचर माहिती मिळूनही हल्ला रोखण्यात आला नाही. त्यांच्या या विधानावर भाजपने प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, माहिती मिळाल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात कुठेतरी सुरक्षेमध्ये त्रुटी असते.
भाजपचे प्रवक्ते तुहिन सिन्हा म्हणाले की, काँग्रेसकडे अशा कोणत्याही दाव्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. तर, झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी म्हणाले की, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरुद्धची लढाई जेव्हा निर्णायक टप्प्यावर आहे तेव्हा काँग्रेस पंतप्रधान मोदी आणि सरकारवर आरोप करत आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, एकीकडे खर्गे बैठकीत देशाच्या पाठीशी उभे राहण्याचा दावा करतात, तर दुसरीकडे ते पंतप्रधानांवर प्रश्न उपस्थित करून देशाला कमकुवत करतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधानांवर त्यांनी केलेली टीका दुर्दैवी आहे.
रांची येथील एका सभेत बोलताना खर्गे म्हणाले की, मागील सर्वपक्षीय बैठकीत सरकारने स्वतः मान्य केले होते की सुरक्षेमध्ये चूक झाली होती. जर त्यांनी ही चूक मान्य केली असेल तर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची जबाबदारीही त्यांनी घेतली पाहिजे. खर्गे यांचा दावा होता की, सरकारला तीन दिवस आधीच बैसारण खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याची माहिती होती, पण योग्य ती कारवाई झाली नाही.
खर्गे यांनी असेही म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचा काश्मीर दौरा रद्द झाला होता, पण ज्या भागात पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या भागाची सुरक्षा त्यांनी सुनिश्चित केली नाही. मात्र, भाजपने हा दावा अंदाज असल्याचे म्हटले आहे.
तुहिन सिन्हा यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधानांचा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द झाला होता, याची कोणतीही पुष्टी नाही. सरकारने सर्वपक्षीय बैठकीत आधीच मान्य केले होते की गुप्तचर माहितीमध्ये चूक झाली होती. असे प्रत्येक देशात होऊ शकते, मग तो अमेरिकेतील ९/११ असो किंवा इस्रायलमधील ऑक्टोबर २०२३ चा हल्ला असो. आमच्या एजन्सींना प्रत्येक वेळी यशस्वी व्हावे लागते, दहशतवाद्यांना फक्त एकदाच. त्यांनी म्हटले की, खर्गे यांनी प्रगल्भता दाखवली पाहिजे होती. ज्या मुद्द्यावर आधीच चर्चा झाली आहे, तो पुन्हा उपस्थित करणे ही केवळ राजकारण आहे.