
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीच्या ५७व्या पदवीप्रदान समारंभाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात ५८७ पीएचडी स्कॉलर्ससह ३,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान संस्थेच्या सोनिपत कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या 'परम प्रज्ञा' या AI-आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटनही करतील.
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत IIT दिल्लीचे संचालक प्रा. रंगन बॅनर्जी यांनी माहिती दिली की, पंतप्रधान मोदी गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे सर्वोच्च सन्मान प्रदान करतील. यामध्ये प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डायरेक्टर गोल्ड मेडल, डॉ. शंकर दयाळ शर्मा गोल्ड मेडल आणि परफेक्ट टेन गोल्ड मेडल्स यांचा समावेश आहे.
यावर्षी एकूण ३,०३६ विद्यार्थी पदवीधर होत आहेत. यामध्ये १,०४९ बीटेक, ५६७ एमटेक, २४८ एमबीए, २४३ एमएससी आणि ५८७ पीएचडी स्कॉलर्सचा समावेश आहे. या पदवीप्रदान समारंभात बॅचलर ऑफ डिझाइन (BDes), एक्झिक्युटिव्ह एमबीए, एमएससी इन बायोलॉजिकल सायन्सेस आणि एमए इन कल्चर, सोसायटी अँड थॉट या अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थीही पदवीधर होणार आहेत.
या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य प्रा. अभय करंदीकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या नवीन उपक्रमांबद्दल बोलताना बॅनर्जी म्हणाले की, IIT दिल्लीने देशभरातील १८ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) सोबत सामंजस्य करार (MoUs) केले आहेत. यातून एक देशव्यापी शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य नेटवर्क तयार केलं जाईल. या भागीदारीमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि प्रकल्पांसाठी एकत्रितपणे काम करणं सोपं होईल. या सहकार्याला पाठिंबा देण्यासाठी संस्थेने ALIGN (Academic Linkages for Innovation and National Growth) नावाचा उपक्रम सुरू केला आहे.
विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि प्लेसमेंट सुधारण्यासाठीही संस्थेने काही पावलं उचलली आहेत. प्लेसमेंट मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये नोकरी मिळालेले विद्यार्थी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय, प्लेसमेंटच्या काळात येणारा ताण आणि चिंता कमी करण्यासाठी 'कॉल फॉर अ फ्रेंड' नावाचा एक खास उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर, IIT दिल्लीने सांगितलं की पूर्णवेळ शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या २०२४-२५ मध्ये ४३ वरून २०२५-२६ मध्ये ६२ पर्यंत वाढली आहे. संस्थेचे सध्या ३० देशांमध्ये ८८ आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार आहेत आणि यावर्षी तीन नवीन आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले आहेत.
गेल्या वर्षभरात संस्थेने ३७ प्राध्यापकांची भरती केली आहे, ज्यामुळे प्राध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर सुधारण्यास आणि बहु-विद्याशाखीय संशोधनाला चालना मिळण्यास मदत होईल. सध्या संस्थेत १६ परदेशी प्राध्यापक आहेत.
IIT दिल्लीने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षात संस्थेला जवळपास ६०० कोटी रुपयांचे स्पॉन्सर्ड रिसर्च, डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सी प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. गेल्या दशकात संस्थेने अंदाजे ४,००० कोटी रुपयांचे असे प्रकल्प हाती घेतले आहेत.
संस्थेच्या नावावर आता १,८७१ बौद्धिक संपदा मालमत्ता (intellectual property assets) आहेत, ज्यात १,७५६ पेटंट्सचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात, IIT दिल्लीने १९६ पेटंट दाखल केले, २६ परवाना करार केले आणि फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (FITT) द्वारे २६ नवीन स्टार्टअप्सना संधी दिली.
नव्याने झालेल्या औद्योगिक सहयोगांमध्ये होरिबा टेक्निकल सेंटर, यामाहा मोटर सोल्युशन्स इंडियासोबत एक इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन लॅब, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग लॅबसाठी आयसीआयसीआय फाउंडेशनकडून उपकरणांची मदत आणि सिस्कोसोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सायबर सुरक्षा संशोधनावर लक्ष केंद्रित करणारे एक जॉइंट टेक्नॉलॉजी हब यांचा समावेश आहे.
बॅनर्जी यांनी सोनिपत कॅम्पसमधील विकासावरही प्रकाश टाकला. तिथे ९,५०० चौरस मीटरची संशोधन आणि शैक्षणिक इमारत पूर्ण झाली आहे. या कॅम्पसमध्ये आरोग्य तंत्रज्ञान आणि हातमाग तंत्रज्ञानावर उत्कृष्टता केंद्र (Centres of Excellence) उभारले जात आहेत.
IIT दिल्लीच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या अबुधाबी कॅम्पसमध्येही २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विस्तार झाला. तिथे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक आणि एनर्जी अँड सस्टेनेबिलिटीमध्ये पीएचडी कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.