
मुंबई : आयची-नागोया इथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताने T12 प्रकारात जबरदस्त कामगिरी केली. सिमरन शर्माने २४.८० सेकंद वेळ नोंदवत पहिलं स्थान पटकावलं, तर तेजलबेन डामोरने २५.२३ सेकंदांची तिची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवत तिसरं स्थान मिळवलं.
सिमरनने ट्रॅकवर भारताचं वर्चस्व सिद्ध करत २४.८० सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि T12 प्रकारात अव्वल स्थान गाठलं. इराणच्या हज्जर सफारजादेहने २५.०२ सेकंद वेळ नोंदवत दुसरं स्थान मिळवलं. ती सिमरनपेक्षा फक्त ०.२२ सेकंद मागे राहिली. भारताच्या तेजलबेन डामोरनेही कमाल केली. तिने २५.२३ सेकंदात शर्यत पूर्ण करत कांस्यपदक जिंकलं आणि स्वतःची सर्वोत्तम वेळही नोंदवली. चीनच्या याकिन शेनने २६.४९ सेकंद वेळ घेत चौथं स्थान मिळवलं.
या दोन पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या आता २६ झाली आहे. बातमी देईपर्यंत भारताच्या खात्यात ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि १२ कांस्यपदकं जमा झाली आहेत. सिमरनचं सुवर्ण आणि तेजलबेनचं कांस्य यामुळे भारतासाठी हा दिवस खूप खास ठरला.
याआधी मंगळवारी पॅरा-स्विमर हिमांशू नांदलने पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल S11 प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. या स्पर्धेतलं पॅरा-स्विमिंगमधलं भारताचं हे दुसरं पदक आहे. चार जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत हिमांशूने ५:१०.९१ अशी वेळ नोंदवत तिसरं स्थान मिळवलं. तो रौप्यपदक विजेता जपानचा उचू टोमिटा याच्यापेक्षा ३२ सेकंद आणि सुवर्णपदक विजेता चीनचा चुआनझेन सन याच्यापेक्षा ४५ सेकंद मागे राहिला. चीनच्या सनने या शर्यतीत आशियाई विक्रमही प्रस्थापित केला.