
पहलगाम दहशतवादी हल्ला: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आज मंगळवारी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने (द रेजिस्टन्स फ्रंट) घेतली आहे.
TRF पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी निगडित आहे. जानेवारी २०२३ मध्ये केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर ही संघटना समोर आली.
सुरुवातीला TRF एक ऑनलाइन व्यासपीठ होते. सहा महिन्यांपेक्षा कमी वेळात ते एक ऑफलाइन संघटना बनले. या दहशतवादी संघटनेमागे लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे. यात लष्करसोबतच इतर दहशतवादी संघटनांचे दहशतवादीही सामील झाले आहेत. या संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक भीषण हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे.
TRF ची स्थापना शेख सज्जाद गुल उर्फ शेख सज्जाद यांनी केली होती. सज्जादचा जन्म १० ऑक्टोबर १९७४ रोजी श्रीनगरमध्ये झाला होता. त्याला २०२२ मध्ये भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. TRF साठी लष्करचे निधीचे मार्गही काम करत आहेत.
२०२२ च्या आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या १७२ दहशतवाद्यांपैकी १०८ द रेजिस्टन्स फ्रंटशी संबंधित होते. दुसऱ्या एका आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की १०० नवीन दहशतवाद्यांपैकी ७४ जणांना TRF ने भरती केले होते. TRF चा शेवटचा मोठा हल्ला गंदेरबल दहशतवादी हल्ला होता. गेल्या वर्षी उत्तर काश्मीरमधील एका बांधकाम स्थळावर सात जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.