
Owaisi on Operation Sindoor : भारताने पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या अड्ड्यात घुसून थेट हल्ला केला आहे! रात्री उशिरा भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून त्यांचा नाश केला आहे. जवळपास २४ क्षेपणास्त्र हल्ल्यात आतापर्यंत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत अशी बातमी आहे. दहशतवाद्यांचे ९ मोठे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, ज्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की आता भारत फक्त वाट पाहणार नाही, जो देश दहशतवादाला पाठिंबा देतो त्याच्यावर थेट हल्ला करेल. दरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी भारतीय सैन्याला सलाम करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले - 'मी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याचे स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला आता असा धडा शिकवावा लागेल की दुसरा 'पहलगाम' कधीच होऊ नये. पाकिस्तानच्या दहशतवादी ढाँच्याचा पूर्णपणे नाश करावा. जय हिंद'
'ऑपरेशन सिंदूर'चे देशभरातील नेत्यांनी स्वागत केले आहे. क्षेपणास्त्र हल्ल्याचे कौतुक आणि सोशल मीडियावर 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' अशा देशभक्तीपर नारे लोक पोस्ट करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत माता की जय', उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'जय हिंद' आणि 'जय हिंद की सेना' असे लिहिले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय हिंद' 'ऑपरेशन सिंदूर!' असे लिहिले. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये 'भारत माता की जय!' असे लिहिले.