नवी दिल्ली- देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. काँग्रेसने आणलेल्या या प्रस्तावाच्या तयारीला टीएमसी आणि सपानेही पाठिंबा जाहीर केला आहे.
सूत्रांनुसार, काँग्रेसला राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर इंडिया ब्लॉकच्या बहुतांश पक्षांकडून बिनशर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून आघाडीपासून दूर असलेल्या ममता बॅनर्जी यांची टीएमसीही एकत्र आली आहे. याशिवाय समाजवादी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊ शकतो.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या इतर घटक पक्षांनी सोमवारी आरोप केला की राज्यसभेतील अध्यक्ष जगदीप धनखड यांची वृत्ती पक्षपाती दिसते.विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलू दिले जात नाही आणि त्यांचा माईक बंद केला जातो, अशी परिस्थिती आहे. सदनाचे कामकाज नियम व परंपरेनुसार व्हावे, ही विरोधी पक्षांची इच्छा आहे. तसेच, सदस्यांविरुद्ध वैयक्तिक टिप्पण्या अस्वीकार्य आहेत.