
NEET UG 2026 Re Exam Date: देशातील सर्वात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा, NEET-UG 2026, सध्या मोठ्या वादात सापडली आहे. पेपरफुटीचे आरोप आणि वाढत्या दबावानंतर, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अखेर पुन्हा परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. आता NEET-UG 2026 ची फेरपरीक्षा २१ जून २०२६, रविवार रोजी होणार आहे. या घोषणेनंतर लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता, थोडा दिलासा आणि गोंधळ अशा संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या NEET-UG 2026 परीक्षेवर तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं, जेव्हा अनेक राज्यांमधून पेपर फुटल्याच्या आणि गैरप्रकाराच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. सोशल मीडियावर परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे दावे केले गेले. यानंतर विरोधी पक्षांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर लावून धरली. अखेर वाढता वाद आणि तपास यंत्रणांची कारवाई बघता NTA ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला असल्याने, संपूर्ण देशाचं लक्ष NTA च्या पुढच्या निर्णयाकडे लागलं होतं.
शुक्रवारी NTA ने आपल्या अधिकृत X हँडलवरून एक घोषणा केली. त्यानुसार, NEET (UG) 2026 ची फेरपरीक्षा आता २१ जून रोजी घेतली जाईल. या निर्णयाला भारत सरकारची मंजुरी मिळाल्याचंही एजन्सीने स्पष्ट केलं. मात्र, परीक्षेची तारीख जाहीर होऊनही विद्यार्थ्यांमधील अस्वस्थता कमी झालेली नाही. अनेक उमेदवारांचं म्हणणं आहे की, या सततच्या बदलांमुळे त्यांच्या मानसिक तयारीवर परिणाम झाला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आहे की, एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी आधीच कडक सुरक्षा व्यवस्था का नव्हती?
NTA ने विद्यार्थी आणि पालकांना सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या नोटीसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. एजन्सीने स्पष्ट केलं आहे की, परीक्षेसंबंधी प्रत्येक अधिकृत माहिती फक्त NTA च्या ऑफिशियल चॅनल्सवरच दिली जाईल.