Nitin Nabin To Be New BJP National President Files Nomination : तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच तरुण नितीन नवीन यांची भाजप अध्यक्षपदी निवड होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी आज भाजप मुख्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
भाजप कार्यालयात ज्येष्ठ नेते
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जी. किशन रेड्डी, मनोहर लाल खट्टर यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह भाजपचे अनेक नेते अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्ष मुख्यालयात पोहोचले.
23
नितीन नबीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणीही अर्ज दाखल न केल्याने नितीन नबीन यांची भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. उमेदवारी अर्ज दुपारी २ ते ४ या वेळेत दाखल करता येणार असून, अर्जांची छाननी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत होणार आहे.
नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन?
उमेदवारांना सायंकाळी ५ ते ६ या वेळेत अर्ज मागे घेता येणार आहे. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी सायंकाळी ६.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन घोषणा करतील. नितीन नबीन यांचे वय सध्या ४५ वर्षे आहे. १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. आता जे.पी. नड्डा यांच्यानंतर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
33
सर्वात तरुण भाजप अध्यक्ष होण्याचा मान
यामुळे, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे नितीन नबीन हे सर्वात तरुण नेते ठरणार आहेत. तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत तरुण नितीन नवीन यांची अध्यक्षपदी निवड होणे महत्त्वाचे मानले जात आहे.