सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्राम आणि यूट्यूबने अनेकांना जगण्याचा आधार दिला आहे. कुठेतरी कोपऱ्यात असलेले लोक आज त्यांच्या राज्यात किंवा देशात प्रसिद्ध झाले आहेत. अविश्वसनीय प्रतिभा प्रकाशात आल्या आहेत. काही जण अयोग्य व्हिडिओ बनवून रातांरात स्टार झाले आहेत. विविध क्षेत्रात संधी उपलब्ध झाल्या आहेत. काही जण ट्रोल होताना संधी मिळवत आहेत. वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये ऑफर मिळत आहेत. पण वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांची कहाणी अर्धवटच संपते हे तितकेच खरे आहे. सोशल मीडियावर आपली प्रतिभा दाखवून यशस्वी झालेलेही अनेक आहेत.
त्यापैकी एक म्हणजे निशा मधुलिका. उत्तर प्रदेशातील निशा आता देशभर प्रसिद्ध आहेत. याचे कारण त्यांचे यूट्यूब चॅनेल. आणखी एक कुतूहलाची गोष्ट म्हणजे, यूट्यूबद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्या निशा आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर आहेत! होय. २०११ च्या मध्यावर यूट्यूब चॅनेल सुरू करून तेथे विविध पाककृती दाखवणाऱ्या निशा मधुलिका यांनी या १३ वर्षांत किती कमाई केली आहे माहितीये का? तब्बल ४३ कोटी रुपये! यामुळे त्या देशातील सर्वात श्रीमंत यूट्यूबर म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर अडीच हजारांपेक्षा जास्त स्वयंपाकाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.
सध्या त्यांचे १४.४ मिलियन म्हणजेच सुमारे १.४४ कोटी सबस्क्राइबर आहेत. सुरुवातीला मागासलेल्या मुलांना शिकवणाऱ्या निशा यांनी नंतर फूड ब्लॉग सुरू केला. २००७ मध्ये त्यांनी वेबसाइट सुरू केली. त्यानंतर २०११ मध्ये स्वयंपाकाचा यूट्यूब चॅनेल सुरू केला. यात त्यांना पती आणि मुलांचेही सहकार्य लाभले आहे असे त्या सांगतात. सुरुवातीला खूप कष्ट झाले. शेवटी हार न मानता स्वयंपाकाचे व्हिडिओ अपलोड करत राहिल्याने आज त्या या टप्प्यावर पोहोचल्या आहेत असे निशा सांगतात. सध्या पाच व्यावसायिकांचे पॅनेल निशा यांचे ऑनलाइन काम पाहते. निशा यांचे पती सकाळी व्हिडिओ शूट करून यूट्यूब चॅनेलवर अपलोड करून नोकरीला जातात असे निशा सांगतात.
६५ वर्षीय निशा ऑनलाइन स्टार आहेत. निशा मधुलिका या लहानपणापासूनच स्वयंपाक करायला लागल्या होत्या. सुरुवातीला त्या पतीसोबत नोएडामध्ये राहत होत्या. मुले शिकायला दूर गेल्यावर त्यांना एकाकीपणा जाणवू लागला (empty nest syndrome). एक प्रकारचे नैराश्य आले. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. २०१४ मध्ये त्या भारतातील टॉप यूट्यूब शेफपैकी एक होत्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.