
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एका तरुणीने बेपत्ता नवऱ्याला शोधण्यासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. सलग तीन दिवस या तरुणीने पोलिसांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. नेलमंगला भागात तीन दिवस चाललेल्या या नाटकीय घडामोडींनंतर पोलिसांनी अखेर या तरुणीला बंगळुरूच्या निमहांस (NIMHANS) रुग्णालयात दाखल केलं आहे.
पावगडा येथे राहणाऱ्या २० वर्षीय सिंधूने बंगळुरू सीमेवरील नेलमंगलामध्ये पोलिसांची डोकेदुखी वाढवली होती. याच महिन्याच्या ६ तारखेला सिंधू आणि गणेश यांचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांतच सिंधूच्या वागणुकीला कंटाळून गणेश घर सोडून निघून गेला. नवरा बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच सिंधूने मदननायकनहळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतरच खऱ्या ड्रामाला सुरुवात झाली. गुन्हा दाखल होऊनही पोलीस नवऱ्याला शोधण्यात वेळ लावत असल्याचा आरोप करत सिंधूने भररस्त्यात ठिय्या मांडला. पोलिसांनी समजूत काढल्यानंतरच ती तिथून उठली.
दुसऱ्या दिवशी सिंधूने मकाली गावातील एका मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिला खाली उतरवलं आणि पावगडा येथील तिच्या आईच्या घरी पाठवून दिलं. पण काल तिने पुन्हा मदननायकनहळ्ळी गाठलं आणि त्याच मोबाईल टॉवरवर जाऊन बसली. हे पाहून पोलीस आणि स्थानिक लोकही चक्रावून गेले. अखेर महिला पोलिसांनी टॉवरवर चढून तिची सुखरूप सुटका केली. सिंधूचं हे विचित्र वागणं पाहून पोलिसांनी तिला पुढील उपचारांसाठी बंगळुरूच्या निमहांस रुग्णालयात हलवलं आहे. दुसरीकडे, तिचा नवरा गणेशचा शोध पोलिसांनी आणखी वेगवान केला आहे.