
Nashik Simhastha Kumbh 2027: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची चाहूल लागली आहे. विश्वविक्रम करण्याच्या उद्देशाने गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो दिवे एकाच वेळी उजळले. मंत्रोच्चार आणि शंखनादाने गोदाघाट दुमदुमून गेला. शनिवारी संध्याकाळी नाशिकमध्ये 'महा गोदा आरती'चा हा भव्य सोहळा पार पडला. या विशेष आरतीमध्ये सुमारे साडेसहा हजार आदिवासी महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात संस्मरणीय करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यातून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यावर आयोजकांचे लक्ष होते.
नाशिक जिल्हा प्रशासन आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने शनिवारी नाशिकच्या रामकुंड आणि पंचवटी परिसरातील घाटांवर या महाआरतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. शनिवारी दुपारी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर एकाच वेळी ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळ्याची विधिवत सुरुवात करण्यात आली.
पाहा व्हिडीओ
#WATCH | Maharashtra | Around 6,500 tribal people from 650 different villages in Nashik are attempting a Guinness World Record by reciting the Godavari Aarti.
Representatives from Guinness World Records are also present to verify the attempt. https://t.co/KoFqqUFUvs
— ANI (@ANI) ३१ ऑक्टोबर, २०२६
या महाआरतीत सहभागी होण्यासाठी नाशिकच्या सात तालुक्यातील सुमारे ६५० आदिवासी गावे आणि पाड्यांमधून ६,५०० हून अधिक प्रतिनिधी आले होते. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि निफाडसह विविध भागातील आदिवासी महिला आणि पुरुषांनी यात सहभाग घेतला. एवढा मोठा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण दिले जात होते. आरतीची प्रत्येक पायरी, ताल आणि समन्वय यावर बारकाईने काम केले गेले.
पाहा व्हिडीओ
A world record attempt for the Godavari River Aarti is underway at Ramkund in Nashik.
Representatives of Guinness World Records are also present at the venue.
#GuinnessWorldRecords
— All India Radio News (@airnewsalerts) ३१ ऑक्टोबर, २०२६
एकमुखी दत्त मंदिर ते रोकडोबा मंदिरापर्यंत रामकुंडाच्या दोन्ही तीरांवर दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळाला. हजारो लोकांची एकाच वेळी आरती, सामूहिक मंत्रोच्चार आणि दिव्यांच्या प्रकाशाने एक अद्भुत वातावरण तयार झाले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखालीच सहभागींची संख्या आणि कार्यक्रमाची माहिती नोंदवली गेली. अंतिम पडताळणीनंतर या विक्रमाची अधिकृत घोषणा केली जाईल.
याआधी कुंभमेळ्याच्या तयारीच्या टप्प्यात ५०१ शंखवादकांनी एकत्र शंखनाद करून विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. पण, महा गोदा आरतीचा उद्देश फक्त विश्वविक्रम करणे हा नाही. आदिवासी संस्कृती आणि परंपरा मोठ्या मंचावर आणणे, सामाजिक सलोख्याचा संदेश देणे आणि नदी संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे. याच उद्देशाने सहभागी झालेल्या ६५० गावांमध्ये आरतीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि नैसर्गिक जलस्रोत वाचवण्यासाठी या गावांमध्ये स्थानिक पातळीवरही नदी आरतीचे आयोजन केले जात आहे.
राष्ट्रपतींची उपस्थिती आणि मोठी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भक्ती, आदिवासी संस्कृती आणि पर्यावरण जागरूकता यांचा सुरेख संगम असलेली नाशिकची ही महा गोदा आरती आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली आहे.