Mumbai Viral Post: मजुराने परत केले ६ हजारांचे पाकीट, प्रामाणिकपणाने जिंकली मने

vivek panmand   | CMS
Published : Oct 14, 2026, 06:43 PM IST
Mumbai Viral Post: मजुराने परत केले ६ हजारांचे पाकीट, प्रामाणिकपणाने जिंकली मने

सार

मुंबईतील एका उद्योजकाचे ६ हजार रुपये आणि महत्त्वाची कार्ड्स असलेले पाकीट हरवले होते. एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला ते सापडले आणि त्याने ते प्रामाणिकपणे परत केले. या मजुराच्या प्रामाणिकपणाची गोष्ट उद्योजकाने लिंक्डइनवर शेअर केली असून, सध्या सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे.

मुंबईतील एका उद्योजकाने नुकताच एक भन्नाट अनुभव शेअर केला आहे. दिवसाला जेमतेम ८०० रुपये कमवणाऱ्या एका मजुराने या उद्योजकाचे हरवलेले पाकीट जसेच्या तसे परत केले. या पाकिटात तब्बल ६ हजार रुपये रोख होते. मजुराने ठरवले असते तर तो हे पैसे सहज स्वतःकडे ठेवू शकला असता आणि कोणाला पत्ताही लागला नसता. पण त्याने तसे न करता प्रामाणिकपणाचा एक मोठा धडाच सर्वांना दिला आहे.

'फिंकी' (FINQY) या वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य विपणन अधिकारी मनीष मसीह यांनी लिंक्डइनवर ही पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सांगितलं की, ते रात्रीच्या जेवणाची तयारी करत असताना त्यांच्या सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड आला. गेटवर एक माणूस तुमची काहीतरी महत्त्वाची वस्तू घेऊन उभा आहे, असं गार्डने त्यांना सांगितलं.

"सुरुवातीला मला वाटलं की कुणीतरी माझी मस्करी करतंय. पण तरीही मी गार्डसोबत गेटवर गेलो. तिथे मला विशी-पंचविशीतला एक मजूर भेटला. तो जवळच्याच शूटिंग स्टुडिओमध्ये काम करत होता," असं मनीष यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. गाडीतून उतरताना मनीष यांचं पाकीट चुकून खाली पडलं होतं, जे या मजुराला सापडलं.

मनीष पुढे म्हणाले, "त्याला ते पाकीट सापडलं आणि तो थेट सिक्युरिटी केबिनमध्ये आला. पाकिटात माझे सगळे आयडी, डेबिट-क्रेडिट कार्ड्स आणि सुमारे ६ हजार रुपये रोख होते. विचार करा, ही रक्कम त्याच्या महिन्याच्या कमाईच्या जवळपास एक तृतीयांश होती. त्याने ते पैसे गुपचूप खिशात घातले असते तरी कुणालाच समजलं नसतं. पण त्याने ते पाकीट जसेच्या तसे परत केले."

"जेव्हा कुणीही पाहत नसतं, तेव्हा तुम्ही कसं वागता यावरून तुमचं खरं चारित्र्य दिसतं," असं मनीष यांनी म्हटलं आहे. पाकीट परत मिळाल्याच्या आनंदात ते त्या मजुराचं नाव विचारायला आणि त्याच्यासोबत फोटो काढायला विसरले. पण जगात अजूनही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला.

येथे पाहा व्हायरल पोस्ट

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ही पोस्ट वाचून अनेक युजर्स भावूक झाले आहेत. मजुराच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास पुन्हा दृढ झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

एका युजरने कमेंट केली की, "या स्वार्थी जगात अजूनही चांगुलपणा टिकून आहे, याची आठवण करून देणारी ही गोष्ट आहे."

दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, "प्रामाणिकपणा आणि निष्ठा या गोष्टी विकत घेता येत नाहीत, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. हे संस्कार आपण आपल्या कुटुंबाकडून शिकतो आणि आयुष्यभर जपतो. बाकी यश आणि पैसा तर मेहनतीच्या जोरावर कधीही मिळवता येतो."

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर विखे पाटलांकडून एकमताची माहिती
Cyber Fraud: गॅस सिलिंडरसह पकडल्याचा बनाव, स्वयंपाक्याने मागितले १८ हजार!