खासदार शशी थरूर यांच्या मांडीवर एक माकड बसून झोपलेल्या छायाचित्रे सोशल मीडियावर वाइरल झाली आहेत. थरूर यांनी माकडाला केळी खायला दिली आणि नंतर ते त्यांच्या मांडीवर झोपी गेले.
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बुधवारी एक्सवर माकडासोबतचे आपले फोटो पोस्ट केले आहेत. थरूर सकाळच्या उन्हात वर्तमानपत्र वाचत बसले होते. ते वर्तमानपत्र वाचत असताना एक माकड आले आणि त्यांच्या मांडीवर बसले.
शशी थरूर यांना सुरुवातीला माकड चाटेल की काय अशी भीती वाटत होती, पण ते घाबरले नाहीत. ते शांतपणे बसले. त्यांनी माकडाला केळी खायला दिली. माकडाने पोटभर केळी खाल्ल्यावर काँग्रेस नेत्याच्या मांडीवरच झोप काढली. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर माकड परत गेले.
थरूर यांनी एक्सवर माकडासोबतचे आपले फोटो पोस्ट केले आहेत. ते म्हणाले, 'आज एक असाधारण अनुभव आला. मी बागेत बसून सकाळचे वर्तमानपत्र वाचत असताना एक माकड आत आले. ते सरळ माझ्याकडे आले आणि माझ्या मांडीवर बसले. आम्ही त्याला काही केळी दिल्या, त्याने त्या खाल्ल्या. नंतर मला मिठी मारली आणि डोके माझ्या छातीवर ठेवून झोपी गेले. मी हळूवारपणे उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते उडी मारून पळून गेले.
थरूर यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वन्यजीवांबद्दलचा आदर आपल्यात अंतर्निहित आहे. माकड चावेल याची मला थोडीशी काळजी वाटत होती. माकड चावल्यास रेबीजची लस घ्यावी लागते. मी शांत होतो, मला ते धोकादायक वाटले नाही. माझा विश्वास बरोबर असल्याचे सिद्ध झाले. आमची भेट शांततेत पार पडली.