
तिरुवनंतपुरम: फुटबॉलचा देव मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सी आणि त्याच्या टीमला केरळमध्ये आणण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणूक प्रकरणी आता पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे. जीएसटीच्या कोल्लम इंटेलिजन्स युनिटने या टॅक्स चोरी प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आहे. जीएसटी विभागाने रिपोर्टर ब्रॉडकास्टिंग कंपनीला (RBC) समन्स बजावले असून, कंपनीच्या संचालकांनाही नोटीस पाठवली आहे. याशिवाय गोकुळम चिट फंड्स आणि हिंदुजा फायनान्सलाही जीएसटीने समन्स धाडले आहे.
सुमारे ५६ कोटी रुपयांचा टॅक्स न भरणे आणि संशयास्पद पद्धतीने कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करणे, या अँगलने ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, जीएसटी वसुली थांबवण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. तिरुवनंतपुरम इंटेलिजन्स विभागाचे डेप्युटी कमिशनर व्ही. सुनील कुमार यांची एका कमी महत्त्वाच्या पदावर रवानगी करण्यात आली आहे. सुनील कुमार यांनी व्हॉट्सॲपवरून दिलेल्या सूचनेमुळे रिपोर्टर कंपनीवरची कारवाई तब्बल आठ महिने रखडली होती.
या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि यातील वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेपाची चौकशी व्हावी, अशी शिफारस जीएसटी एसआयटीने (SIT) दोन महिन्यांपूर्वीच केली होती. पण त्यावर कोणतीही पुढची कारवाई झाली नाही. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कासारगोड युनिटचे अधिकारी सचित यांचीही बदली करण्यात आली आहे.