२६ जानेवारी : एका अनोख्या देशभक्ताची गोष्ट

मध्य प्रदेशातील एका सरकारी कर्मचाऱ्याचे नाव '२६ जानेवारी' आहे. त्यांचा जन्म २६ जानेवारी १९६६ रोजी झाला आणि त्यांच्या वडिलांनी प्रजासत्ताक दिनाच्या सन्मानार्थ त्यांना हे नाव दिले.

आपल्या सर्वांना आपल्या देशावर प्रेम आहे. आपण ते प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. पण या माणसाप्रमाणे देशप्रेम व्यक्त करणे कदाचित आपल्याला जमणार नाही. कारण त्याचे नावच इतके अनोखे आहे.

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील डाइट कॉलेजमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याची ही गोष्ट आहे. त्यांचे नाव ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल. त्यांचे नाव '२६ जानेवारी' आहे. हो, आपल्या प्रजासत्ताक दिनाचेच नाव आहे त्यांचे. त्यांचे पूर्ण नाव '२६ जानेवारी टेलर' आहे. ते येथे शिपाई म्हणून काम करतात. सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचे अधिकृत नाव '२६ जानेवारी टेलर' असेच आहे.

१९६६ च्या २६ जानेवारी रोजी त्यांचा जन्म झाला. त्या दिवशी त्यांचे वडील सत्यनारायण टेलर झाबुआ येथे मुख्याध्यापक होते. प्रजासत्ताक दिनी शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असताना, विद्यार्थ्यांशी बोलत असतानाच त्यांना मुलगा झाल्याची बातमी कळाली. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला '२६ जानेवारी' हे नाव देण्याचा निर्णय घेतला.

पण या नावामुळे अनेक अडचणी आल्याचे २६ जानेवारी सांगतात. अनेकदा त्यांना आपल्या नावाबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागते. तसेच हेच माझे नाव आहे असे सांगितल्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणून ते ओळखपत्र नेहमी सोबत बाळगतात.

पण हे नाव त्यांना अभिमान वाटण्याचे कारण आहे असे २६ जानेवारी सांगतात. दरवर्षी २६ जानेवारीला त्यांचे मित्र आणि सहकारी ध्वजारोहणानंतर त्यांचा वाढदिवस साजरा करतात.

Share this article