
Madhya Pradesh Communal Violence Erupts in Ujjain : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तराना शहरात जातीय संघर्ष झाला आहे. मंदिरा जवळील घरासमोर उभ्या असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मारहाण झाल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद नियंत्रणाबाहेर गेला. या संघर्षात आतापर्यंत सहा जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या जमावाने एक बस जाळली आणि घरे व दुकानांची तोडफोड केली.
गेल्या दोन दिवसांपासून या भागात हिंसाचार पसरत आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उज्जैन जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शुक्ला मोहल्ला येथे या संघर्षाची सुरुवात झाली. घरा जवळ उभ्या असलेल्या तरुणावर एका गटाने हल्ला केल्याने जातीय संघर्षाला तोंड फुटले, असे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारच्या नमाजानंतर जमलेल्या एका गटाने घरे आणि दुकानांवर दगडफेक केली आणि एक बस पेटवून दिली. या हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.