“भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू...”, अमित शाहांचं मोठं वक्तव्य

तेलंगणाच्या भोनगीर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारासाठी आयोजित प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती आणि ओबीसी आरक्षण वाढणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

 

भोनगीर, तेलंगणा : तेलंगणाच्या भोनगीर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारासाठी आयोजित प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मुस्लिम आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं (ओबीसी) आरक्षण वाढणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

अमित शाह म्हणाले, काँग्रेस खोटं बोलून, अफवा पसरवून निवडणुका लढू आणि जिंकू पाहत आहे. ते लोक म्हणतात की भाजप पुन्हा सत्तेवर आली, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते आरक्षण संपवून टाकतील. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या १० वर्षांपासून या देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी कधी तसा विचारही केला नाही. १० वर्षांत आम्ही आरक्षणाला गालबोटही लावलं नाही. काँग्रेस पक्षाने मात्र मुसलमानांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण कमी केले काँग्रेसने एक प्रकारे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर दरोडा टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुस्लीम आरक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे. मुस्लीम आरक्षणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने काँग्रेससह इंडिया आघाडीवर टीका करत असतानाच बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी सत्तेत आम्ही आल्यास मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्दावरुन राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.

 

Share this article