
मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या (लाडली बहना योजना) लाभार्थींसाठी खूशखबर आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवली जात असून ही रक्कम थेट दरमहा 5 हजार रुपयांवर जाणार आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तसे संकेत दिले आहेत. सध्या राज्यातील 1.26 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत त्यांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. पूर्वी ही रक्कम 1250 रुपये होती, जी दिवाळीनिमित्त 250 रुपयांनी वाढवून 1500 रुपये करण्यात आली. बहिणींच्या खात्यात पाठवल्या जाणाऱ्या रकमेत सरकार सातत्याने वाढ करत आहे. आता मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या एका विधानामुळे लाडक्या बहिणींना 5 हजार रुपये मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सरकार खरोखरच 3 हजारांऐवजी पाच हजार रुपये रक्कम वाढवण्याच्या तयारीत आहे का, हे जाणून घेऊया.
वास्तविक, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीणा योजनेच्या रकमेत भविष्यात आणखी मोठी वाढ केली जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधक लाडक्या बहिणींना 3000 रुपये देण्याबद्दल बोलत आहेत, पण आमचे सरकार पुढे जाऊन दरमहा 3 हजार काय, 5 हजार रुपयांची मदत देईल.
मुख्यमंत्री म्हणाले- सरकारकडे 2047 पर्यंतचा रोडमॅप तयार आहे. सरकार एका वर्षाच्या आत 1 लाख, तर पाच वर्षांच्या आत अडीच लाख सरकारी पदांची भरती करेल. हे केव्हापर्यंत करणार, असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले- आमच्याकडे संकल्पपत्रानुसार सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी 2028 पर्यंत वेळ आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडली बहना योजना सुरू केली होती. मार्च 2023 पासून दरमहा 1000 रुपये आर्थिक मदतीसह ही योजना सुरू झाली. सप्टेंबर 2023 पासून 1,250 रुपये आर्थिक मदत दिली जाऊ लागली. तर याच वर्षी दिवाळीत 250 रुपये वाढ करून ती 1500 रुपये करण्यात आली. लाडकी बहीण योजनेचा लाभ 18 ते 60 वयोगटातील विवाहित किंवा घटस्फोटित महिलांनाच मिळत आहे.
शिवराजसिंह यांनी 2028पर्यंत बहिणींना 3 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली होती. आता 2027 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 3 हजार केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही ही रक्कम टप्प्याटप्प्याने हळूहळू वाढवली जाईल, असे म्हटले आहेच.
राज्यातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा नोंदणी कधी सुरू होईल याची वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप लाडकी बहीण योजना 2.0 बाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. 2023 पासून नवीन नोंदणी बंद आहे.