दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागातील रेल्वे चालकांना काही पेये पिण्यास मनाई करण्यात आली आहे.
तिरुवनंतपुरम: दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागातील लोको पायलटना लिंबू सरबत, काही पेये आणि फळे, कफ सिरप, होमिओपॅथी औषधे आणि माउथवॉश वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण, यामुळे त्यांची श्वास चाचणी केली असता यंत्रात बिघाड होऊन त्यात अल्कोहोल असल्याचे निष्कर्ष येतात, ज्यामुळे कामात अडथळा येतो.
यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून, ‘कर्मचारी कामावर आल्यावर आणि काम संपवून निघताना घेतल्या जाणाऱ्या श्वास चाचणीत अल्कोहोलचे अंश आढळून येत आहेत. त्यामुळे यादीतील पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे. जर त्यांचे सेवन करणे आवश्यक असेल तर आधी साक्षीदारासह माहिती द्यावी’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्ये बाहेरील राज्यातील लोकांना शेतीची जमीन खरेदी करण्यास मनाई
डेहराडून: शेतीच्या जमिनीचा गैरवापर रोखण्यासाठी उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी सरकार पुढाकार घेत असून, राज्यातील १३ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांना शेतीची जमीन खरेदी करण्यास मनाई करणारे विधेयक सरकार मांडणार आहे. आधीच मसुदा विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. हरिद्वार आणि उधम सिंग नगर जिल्ह्यांना वगळता उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांना शेतीची जमीन खरेदी करण्यास हे विधेयक बंदी घालते. मात्र, घर बांधण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. तसेच जमीन वादात जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून ते राज्य सरकारकडे हस्तांतरित केले जातील.