
मुंबई (३० सप्टेंबर): रिलायन्स जिओने आपल्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी अनेक भन्नाट ऑफर्स आणल्या आहेत. अगदी कमी पैशात ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या अॅनिव्हर्सरी ऑफरचाच एक भाग म्हणून 'जिओ भारत 4G' फोन आता फक्त १,४९९ रुपयांना मिळत आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे, या फोनसोबत तुम्हाला तब्बल ६ महिन्यांचे रिचार्ज एकदम फ्री मिळणार आहे. या फ्री रिचार्जमध्ये ग्राहकांना दर महिन्याला १४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल. म्हणजेच, एकदा फोन विकत घेतला की पुढचे ६ महिने रिचार्जचं कोणतंच टेन्शन नाही.
जे लोक आजही जुने 2G फिचर फोन वापरतात, त्यांच्यासाठी कंपनीने ही खास ऑफर डिझाइन केली आहे. जिओच्या म्हणण्यानुसार, असे ग्राहक सहसा महिन्याला १९९ रुपयांचे रिचार्ज मारतात. सहा महिन्यांचा हिशोब केला तर हा खर्च १,२०० रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे, १,४९९ रुपयांत नवीन 4G फोन आणि ६ महिन्यांचे रिचार्ज मिळत असल्याने, 2G वरून 4G वर शिफ्ट होण्याचा तुमचा अतिरिक्त खर्च फक्त २९९ रुपये इतकाच येतो. अर्थात, फोन खरेदी करताना ग्राहकांना १,४९९ रुपये पूर्ण भरावे लागतील.
4G वर शिफ्ट झाल्यामुळे ग्राहकांना फक्त अल्ट्रा-फास्ट इंटरनेटच मिळणार नाही, तर जिओ भारत फोनमध्ये ५०० हून अधिक टीव्ही चॅनेल्स असलेले जिओटीव्ही (JioTV), जिओहॉटस्टारवर (JioHotstar) क्रिकेट, सिनेमे आणि मनोरंजन, म्युझिक, तसेच जिओपे (JioPay) द्वारे यूपीआय (UPI) पेमेंटसारख्या सुविधाही मिळतील. या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले आणि 2000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही ऑफर फक्त जिओ भारतच्या A1, B1, B2 आणि B3 या ठराविक मॉडेल्सवरच लागू असेल.
दरम्यान, नुकतेच ट्रायने (TRAI) रिचार्ज संदर्भात एक महत्त्वाचा आदेश दिला होता. ग्राहकांना स्वस्तात रिचार्ज उपलब्ध व्हावेत, असा यामागचा उद्देश आहे. ज्यांना इंटरनेट डेटाची गरज नाही, त्यांच्यावर डेटा पॅक सक्तीचे करू नयेत. फक्त कॉलिंग आणि एसएमएस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅन्स आणावेत, अशा सूचना ट्रायने दिल्या आहेत. तसेच, महिन्याची व्हॅलिडिटी २८ दिवसांऐवजी ३० दिवसांची असावी, असाही आदेश देण्यात आला आहे.