
मुंबई : लखनौमधून एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका जपानी जोडप्याने त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. २०२२ मध्ये घटस्फोट घेतलेले हिरो चिहारा आणि शिझू यांनी उत्तर प्रदेशमध्ये पारंपरिक हिंदू विवाह पद्धतीने पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
२३ नोव्हेंबरला गोमती नगर येथील राधा-कृष्ण मंदिरात या जोडप्याने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांची तीन मुले, कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
२०२३ मध्ये ते पुन्हा एकत्र आले. काही काळ वेगळे राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भारतीय मित्रांच्या पाठिंब्याने या दोघांनी पुन्हा एकदा लग्न करत आपल्या नात्याला नवी सुरुवात केली.
या लग्नाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या जोडप्याने पारंपरिक हिंदू चालीरीतींचे पालन केले. आपल्या देशातील पारंपरिक पद्धतीऐवजी, हिरो आणि शिझू यांनी दुसऱ्या लग्नासाठी भारतीय विवाह परंपरांचा स्वीकार केला.
#WATCH | Lucknow, Uttar Pradesh: The husband, Hiro Chihara, said, "It was a very precious experience that we could have such a beautiful wedding...we divorced in 2022 and remarried each other, we wanted to do it in India." (23.11) https://t.co/teu5Tddfwt
— ANI (@ANI) November 23, 2026
नवरदेवाने पारंपरिक कुर्ता-पायजमा तर शिझू हिने सलवार-कुर्ता घातला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे झेंडूच्या फुलांचे हार घालताना, लग्नाचे विधी करताना आणि अग्नीभोवती फेरे घेताना दिसत आहे.
या लग्नातील एक संस्मरणीय क्षण म्हणजे हिरोने शिझूला सिंदूर लावण्याचा. आई-वडिलांच्या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांची तीन मुलेही उपस्थित होती. यामुळे लग्नाच्या आनंदाला भावनिक किनार मिळाली.
प्रियजनांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले आणि या जोडप्याने आपल्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.
भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दलच्या त्यांच्या आदरामुळेच त्यांनी भारतात लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिरोने सांगितले की, त्यांना भारतात नेहमीच लग्न करण्याची इच्छा होती.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना हिरोने या सोहळ्याचे वर्णन 'अनमोल अनुभव' असे केले आणि पुन्हा लग्न केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
तो म्हणाला, "असा सुंदर विवाह सोहळा अनुभवता आला, हा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण होता." भारताची निवड करण्यामागचे कारण स्पष्ट करताना तो म्हणाला, "आम्हाला भारतावर प्रेम आहे. आम्हाला हे भारतातच करायचे होते."
लखनौ भेट आणि भारतीय मित्रांशी असलेली जवळीक यातून त्यांची इच्छा पूर्ण झाली. एएनआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळत असून, हिंदू विवाह परंपरा स्वीकारल्याबद्दल प्रेक्षक त्यांचे कौतुक करत आहेत.
हिरो आणि शिझू यांच्यासाठी हे केवळ दुसरे लग्न नव्हते, तर हे अशा नात्याचे सेलिब्रेशन होते, जे विभक्त होऊनही टिकले आणि ज्याला आता नवी सुरुवात मिळाली आहे.