
नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल रात्री प्रकृतीच्या कारणांचा हवाला देत अचानक राजीनामा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी त्यांच्या राजीनाम्याला तात्काळ मंजुरी दिली आहे. मात्र, या राजीनाम्यामागे घडलेला संपूर्ण घटनाक्रम आता उघडकीस येत असून, यामध्ये राजकीय हालचालींचा मोठा खेळ रंगल्याचं स्पष्ट होत आहे. धनखड यांचा कार्यकाळ संपण्यास तब्बल दोन वर्षे बाकी असताना, त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
धनखड यांनी राज्यसभेचे सभापती या नात्याने न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधात प्रस्ताव असल्याची घोषणा सोमवारी अचानक केली. विशेष म्हणजे, याबाबत सरकारकडे कोणतीही पूर्वसूचना नव्हती. त्यामुळे सरकार पूर्णपणे अनभिज्ञ असून ही घोषणा झाल्यावर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला. या प्रस्तावावर आधीच लोकसभेसाठी रणनीती ठरवली गेली होती. विरोधकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून स्वाक्षऱ्याही घेतल्या गेल्या होत्या. मात्र राज्यसभेच्या सभापतीने प्रस्तावाची घोषणा करून सगळंच गणित बिघडवलं.
घटनाक्रम चिघळत असल्याचं लक्षात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली. ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात झाली. यानंतर राज्यसभेतील खासदारांना चीफ व्हिपमार्फत तात्काळ बोलावण्यात आलं. त्यांना ‘10-10 जणांच्या गटांमध्ये’ विभागून बैठकीच्या ठिकाणी येण्याच्या सूचना दिल्या गेल्या. बैठकीत खासदारांकडून एक प्रस्तावावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मित्र पक्षांच्या खासदारांनाही बोलावून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. या बैठकीदरम्यान खासदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, "या विषयावर कुणाशीही बोलू नका आणि पुढील चार दिवस दिल्ली सोडू नका."
खासदारांचे मत आणि साक्षी गोळा केल्यानंतर, सरकारने धनखड यांच्याशी संवाद साधला. त्यानंतरच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. रात्री उशिरा वरिष्ठ मंत्र्यांची पुन्हा एक बैठक झाली. त्यामध्ये धनखड यांनी गेल्या काही महिन्यांत कोणत्या प्रसंगी मर्यादा ओलांडल्या, सरकारची कशी अडचण केली, आणि नेत्यांना कशा प्रकारे उघडपणे सुनावलं, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तेवढ्यात धनखड यांनी स्वतःचा राजीनामा जाहीर केला आणि चर्चांना पूर्णविराम लागला.
धनखड यांचा राजीनामा हा फक्त "प्रकृतीच्या कारणास्तव" इतकाच नसून, यामागे अनेक राजकीय अंतःप्रवाह आणि सरकारची असहायता लपलेली आहे. त्यांच्या कार्यशैलीने सत्ताधाऱ्यांची जी अडचण निर्माण केली होती, त्याचा शेवट अखेर त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीने झाला.