अटारी बॉर्डरवर गुप्त कारवायांचा उलगडा? यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि ISI एजंटच्या चॅटने खळबळ माजवली

Published : May 20, 2025, 05:36 PM IST
Jyoti Malhotra Haryana YouTuber kon hai

सार

ट्रॅव्हल व्लॉगिंगच्या आडून गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI पर्यंत पोहोचवल्याचा संशय यूट्यूबर ज्योती मल्होत्रावर आहे. तिच्या मोबाईलमधून सापडलेल्या संवेदनशील चॅट्समुळे देशभर खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातल्या अंतर्गत सुरक्षेचा काटेकोर आढावा घेतला जात असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ट्रॅव्हल व्लॉगिंगच्या आडून गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI पर्यंत पोहोचवल्याचा गंभीर संशय यूट्यूबर ज्योती मल्होत्रावर व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि लष्करी गुप्तचर संस्थांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतले असून, तिच्या मोबाईलमधून सापडलेल्या संवेदनशील चॅट्समुळे देशभर खळबळ उडाली आहे.

ISI एजंट आणि ज्योती यांच्यातील संवादात ‘गुप्त मिशन’चा उल्लेख?

हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी ISI अधिकारी अली हसन यांच्यात अटारी बॉर्डर संदर्भातील चॅट समोर आलं आहे. या संवादात अली हसन सातत्याने अटारी सीमेवर ‘प्रोटोकॉल’ कोणाला मिळालं होतं, कोणी अंडरकव्हर एजंट होता का, अशा बाबी विचारतो आहे.

संवादाचा काही भाग असा होता:

अली हसन: “जेव्हा तुम्ही अटारीला आला होतात, तेव्हा प्रोटोकॉल कोणाला मिळाला होता?”

ज्योती: “कोणाला मिळाला? मला तर नाही मिळाला.”

अली हसन: “कोणी अंडरकव्हर व्यक्ती होती का? त्याला गुरुद्वाऱ्यात आत न्यायचं होतं. खोलीत दोघांना ठेवायचं होतं...”

ज्योती: (हसण्याची इमोजी पाठवत) “इतके मूर्ख थोडीच होते ते…”

हा संवाद वाचून स्पष्ट होतं की भारताच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि ज्योती त्यात कळत-नकळत सहभागी झाली असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून तपासली जात आहे.

NIA, IB, आणि मिलिट्री इंटेलिजन्सची संयुक्त चौकशी

ज्योतीला अटक केल्यानंतर NIAचं पथक तिला चंदीगडला घेऊन गेलं आणि तिथे सात तासांची सखोल चौकशी झाली. याशिवाय, इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि मिलिट्री इंटेलिजन्सचे अधिकारीही या प्रकरणात सक्रिय आहेत. ज्योतीने चौकशीत ISIशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला असला, तरी तिच्या मोबाईलमधील पुरावे काही वेगळीच कथा सांगत आहेत.

NIAच्या ताब्यात संपूर्ण चॅट ट्रान्सक्रिप्ट असून त्याच्या आधारे तपास पुढे सुरू आहे. सध्या समोर आलेला संवाद हा केवळ एक छोटासा भाग आहे, पण तोच इतका स्फोटक आहे की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

घरातलेच शत्रू? देशांतर्गत गुप्त यंत्रणांची वाढती चिंता

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्याने सीमावर्ती भागातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले. पण आता देशांतर्गत 'घरभेदी' सक्रिय झाल्याचा संशय असल्याने गुप्तचर यंत्रणांची चिंता वाढली आहे. सोशल मिडियाचा वापर करून गुप्त माहिती गोळा करणे आणि ती परदेशी गुप्तचर संघटनांना देणे, ही नवीन हेरगिरीची शैली असल्याचे मानले जात आहे.

ज्योती मल्होत्रा आणि ISI एजंटमधील हा संवाद केवळ एक वैयक्तिक प्रकरण नसून, तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा इशारा आहे. तिच्याविरुद्ध पुरावे सापडल्यास तीवर गुप्तचर कायद्यांतर्गत कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!