
Viral Video : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI) एक नोटीस मिळाली आहे. मुंबई-एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमध्ये केटरिंगचा कर्मचारी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जेवणाची भांडी साफ करताना दिसत आहे.
'ट्रुथ ऑन ट्रॅक' नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक कर्मचारी ट्रेनच्या टॉयलेटमध्ये असून, बंद सीटवर एका बास्केटमध्ये भांडी ठेवलेली दिसत आहेत. पोस्टनुसार, प्रवाशांना जेवण देण्यासाठी वापरण्यात येणारी ताटं आणि इतर भांडी अत्यंत अस्वच्छ पद्धतीने हाताळली जात होती.
रिपोर्टनुसार, ही घटना ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमध्ये घडली, जिथे प्रवासी अधिक चांगल्या स्वच्छतेची आणि सेवेची अपेक्षा करतात. इतक्या प्रीमियम क्लासमध्ये स्वच्छतेची अशी गंभीर समस्या कशी उद्भवू शकते, असा प्रश्नही या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे. तसंच, या तक्रारीवर IRCTC आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याची माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये, एक प्रवासी या घटनेचे रेकॉर्डिंग करताना IRCTC कर्मचाऱ्याला जाब विचारताना दिसतो. तो विचारतो, "हे काय करत आहात? ही जागा आहे का हे सगळं करायची?" यावर तो कर्मचारी शांतच राहतो. त्यानंतर प्रवासी टॉयलेटबाहेर उभ्या असलेल्या एका अटेंडंटकडे वळतो आणि त्याला याबद्दल माहिती आहे का, असे विचारतो. त्यावर तो अटेंडंट म्हणतो, "नाही, मी आताच हे पाहिलं."
पुढे तो प्रवासी म्हणतो, "तुम्ही दुरंतो एक्सप्रेसचे अटेंडंट आहात आणि तुम्हाला माहीत नाही की टॉयलेटमध्ये भांडी धुतली जात आहेत? याच भांड्यांमधून तुम्ही जेवण वाढता का?" यावर तो अटेंडंट उत्तर देतो, "मी नाही पाहिलं. जे भांडी धुतात ते सहसा तिथेच (टॉयलेटच्या बाहेर दुसरीकडे इशारा करत) धुतात."
A complaint was raised regarding alleged hygiene concerns onboard Train 12223 Duronto Express (First AC Coach H1) after visuals reportedly showed food plates and cutlery placed near/on a toilet seat area during onboard lunch service, raising serious passenger concerns around… pic.twitter.com/1OgUCuyjlX
— Truth On Track (@truth_on_track) May 27, 2026
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर, FSSAI ने IRCTC ला नोटीस पाठवून या कथित घटनेबाबत सत्य परिस्थिती मांडण्यास सांगितले आहे.
अन्न सुरक्षा प्राधिकरणाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, हे कृत्य अन्न सुरक्षा आणि मानक (अन्न व्यवसाय परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ च्या शेड्यूल ४ मध्ये नमूद केलेल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक मानकांचे उल्लंघन आहे. FSSAI च्या मते, या नियमांनुसार अन्न आणि अन्न-संपर्क पृष्ठभाग दूषित होऊ नयेत यासाठी अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, हाताळणी आणि साफसफाईची प्रक्रिया काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
रेल्वेच्या केटरिंग एजन्सीने अद्याप या नोटीसला सार्वजनिकरित्या कोणतेही उत्तर दिलेले नाही.