
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइनच्या ('IndiGo Crisis') मोठ्या विमानसेवा विस्कळीततेमुळे देशभरात निर्माण झालेल्या गोंधळादरम्यान, केंद्र सरकारने आज (६ नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी आणि भरमसाठ तिकीट दरांची गंभीर दखल घेत, परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत भाड्यावर कठोर मर्यादा (Fare Caps) घालण्याचे निर्देश नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत.
नागरी उड्डाण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे की, सध्याच्या गोंधळात काही विमान कंपन्यांकडून आकारले जाणारे अवाजवी दर मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहेत.
मंत्रालय म्हणाले, "प्रवाशांचे कोणत्याही स्वरूपाच्या 'संधीसाधू किंमत' धोरणापासून (Opportunistic Pricing) संरक्षण करण्यासाठी, मंत्रालयाने आपल्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे, जेणेकरून सर्व प्रभावित मार्गांवर वाजवी आणि योग्य भाडे आकारले जाईल."
कठोर आदेश: सर्व विमान कंपन्यांना निर्धारित केलेल्या 'भाडे मर्यादां'चे (Fare Caps) काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अंमलबजावणी: परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत या भाडे मर्यादा लागू राहतील.
या निर्देशाचा मुख्य उद्देश बाजारातील किमतीचे शिस्तपालन राखणे, संकटात असलेल्या प्रवाशांचे शोषण थांबवणे आणि ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्ण अशा नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याची खात्री करणे आहे.
गेल्या आठवड्यात, प्रामुख्याने क्रूच्या कमतरतेमुळे इंडिगो एअरलाइनला हजारो विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे देशभरातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आणि काही मार्गांवर तिकीट दरांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली.
शुक्रवारी, इंडिगोने विविध विमानतळांवरून १,००० हून अधिक उड्डाणे रद्द केल्यानंतर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल व्हिडिओ संदेशाद्वारे माफी मागितली होती.
शुक्रवारी तिकीट दरांनी सर्व विक्रम मोडले. उदाहरणार्थ, ६ डिसेंबरसाठी कोलकाता-मुंबई स्पाईसजेटच्या एका इकॉनॉमी क्लास तिकीटाचा दर ९०,००० रुपयांपर्यंत पोहोचला होता, तर मुंबई-भुवनेश्वर एअर इंडियाच्या तिकीटाचा दर ८४,४८५ रुपयांपर्यंत गेला होता. एका सूत्रांनी सांगितले की, "शेवटच्या क्षणी (Last-Minute) तिकिटे सामान्यतः सरासरी दरापेक्षा दुप्पट-तिप्पट असतात, पण या परिस्थितीत ती सहा पटीने वाढलेली दिसली."
या गोंधळानंतर, इंडिगोला दिलासा देण्यासाठी DGCA ने पायलटसाठी रात्रीच्या ड्युटीची (Night Duty) परिभाषा १२ AM - ५ AM अशी केली आहे (जी पूर्वी १२ AM - ६ AM होती) आणि पायलटना ६ ऐवजी २ रात्रीची लँडिंग करण्याची तात्पुरती मुभा दिली आहे. तसेच, सुधारित 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' (FDTL) नियम लागू करण्याची अंमलबजावणी देखील स्थगित करण्यात आली आहे.