
एका प्रवाशाच्या कानात रात्रीच्या प्रवासादरम्यान वायरलेस इअरबडचा सिलिकॉनचा भाग (टीप) अडकला. यामुळे मध्यरात्री अचानक मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाली. पण भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने एका डॉक्टरांना ट्रेनमध्ये पाठवून मदत केली. त्यामुळे एक मोठा ताण कमी झाला आणि या घटनेचा शेवट गोड झाला.
या प्रवाशाने रेडिट (Reddit) वर एक पोस्ट शेअर करून आपला अनुभव सांगितला आहे. "रात्रीच्या प्रवासात अचानक मेडिकल इमर्जन्सी आली आणि भारतीय रेल्वेने ज्या वेगाने मदत केली, ते पाहून मी खरंच थक्क झालो," असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने रेल्वेच्या या तत्पर कारवाईचं खूप कौतुक केलं.
हा प्रवासी कावेरी एक्सप्रेसने प्रवास करत होता. त्यावेळी त्याच्या डाव्या कानात वायरलेस इअरबडचा सिलिकॉनचा भाग अडकला. सुरुवातीला त्याला वाटलं की तो स्वतःच ते काढू शकेल. पण काढण्याच्या प्रयत्नात तो भाग कानात आणखी आत गेला. "जेव्हा मला कान बंद झाल्यासारखं वाटलं आणि थोडी जळजळ होऊ लागली, तेव्हा मी घाबरलो," असं त्याने सांगितलं.
त्याने लगेच १३९ या रेल्वे हेल्पलाइनवर कॉल करून मदतीची विनंती केली. तो म्हणाला, "त्यांनी मला परत कॉल केला आणि रुग्णवाहिकेची गरज आहे का, असं विचारलं. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ (RPF) यांनी मिळून जोलारपेट्टई (Jolarpettai) स्टेशनवर एका डॉक्टरांची व्यवस्था केली. डॉक्टरांनी माझा कान तपासला आणि कोणतीही वेदना न होता तो सिलिकॉनचा भाग सहज बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रक्तस्राव तर होत नाही ना, हेही तपासलं."
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे हा प्रवासी खूपच प्रभावित झाला. "मी मध्यरात्री एका धावत्या ट्रेनमध्ये होतो. मला वाटलं होतं की आता प्रवास अर्ध्यावरच सोडावा लागेल. पण मला एकट्याला वाऱ्यावर न सोडता, त्यांनी माझी अडचण समजून घेतली आणि वैद्यकीय मदत मिळवून दिली," असं तो पुढे म्हणाला.
या घटनेने इतर युजर्सचंही लक्ष वेधून घेतलं आहे. रेल्वेच्या या जलद प्रतिसादाचं लोक खूप कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं, "रेल्वेतील या नवीन सुधारणांकडे लोकांचं फारसं लक्ष जात नाही. पण तुम्हाला वेळेवर मदत मिळाली, हे खूप छान झालं!"
दुसऱ्या एका व्यक्तीने आपला अनुभव शेअर करताना सांगितलं, "माझाही असाच अनुभव आहे... रेल्वेची ही वैद्यकीय आपत्कालीन सेवा खरंच खूप चांगली आहे. मी गेल्या २ दिवसांपासून माझ्या आईसोबत प्रवास करत होतो, तेव्हा तिला फूड पॉयझनिंग झालं. डॉक्टरांनी लगेच येऊन तपासलं आणि औषधंही दिली. रेल्वेचं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे."
आणखी एकाने कमेंट केली, "यात नवीन काहीच नाही!!!! रेल मदत (Rail Madad) म्हणजे साक्षात देवाने पाठवलेली मदत आहे... ते खूप फास्ट काम करतात!!!"