पती-पत्नीच्या भांडणातून भारतीय रेल्वेचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. न्यायालयाने पत्नीचे वर्तन मानसिक क्रूरता मानून घटस्फोट मंजूर केला आहे.
रायपूर: छत्तीसगड उच्च न्यायालयात एका विचित्र प्रकरणाची सुनावणी झाली. पती-पत्नीच्या भांडणातून भारतीय रेल्वेचे तब्बल ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याच कारणास्तव पत्नीपासून दूर जाण्यासाठी पती पुढे आला असून त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची सुनावणी करताना न्यायालयाने, ड्युटीवर असताना पतीला त्रास देणे हे मानसिक क्रूरता असल्याचे मत व्यक्त केले आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्या. संजय अग्रवाल यांच्या खंडपीठाने या अर्जाची सुनावणी केली.
घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणारा व्यक्ती भारतीय रेल्वेत काम करतो. कर्तव्यावर असताना पत्नी वारंवार फोन करून त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नाआधी एका ग्रंथपालावर प्रेम करत होती. लग्नानंतरही त्यांचे संबंध सुरू होते, असे कारण न्यायालयात दिले आहे. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
१२ ऑक्टोबर २०११ रोजी भिलाई येथील एका तरुणीचा विवाह विशाखापट्टणम येथील एका तरुणाशी झाला. तरुण रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर म्हणून काम करत होता. लग्नानंतर १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या स्वागताच्या कार्यक्रमात वधू खूश नव्हती. हे पाहून वराला काय झाले असे विचारले. तेव्हा वधूने सांगितले की, कॉलेजमध्ये तिचे ग्रंथपालासोबत संबंध होते. त्याच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंधही होते आणि ते तिला विसरता येत नाहीत, असे गुपित तिने उघड केले. लगेच वधूच्या वडिलांकडे गेल्यावर सर्व काही सांगितले असता, मुलगी पुढे असे करणार नाही आणि चांगले संसार करेल असे त्यांनी सांगितले. हे वरही मान्य केले.
मग रेल्वेचे नुकसान कसे झाले?
न्यायालयाच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. कामावर आल्यानंतरही फोनवरून त्यांचे भांडण सुरूच होते. भांडणाच्या वेळी 'ठीक आहे' असे म्हणण्यामुळे रेल्वेचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात रेल्वे स्थानकाचा फोन घेऊन तो व्यक्ती बोलत होता. यावेळी घरी या, इथेच सर्व काही बोलूया असे पत्नीने म्हटल्यावर त्याने 'ठीक आहे' असे म्हटले. दुसऱ्या फोनवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने 'ठीक आहे' ऐकल्यावर मालगाडीला हिरवा सिग्नल दिला. यामुळे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वे वाहतुकीत मोठा व्यत्यय आला आणि रेल्वेचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. निष्काळजीपणामुळे त्या व्यक्तीला निलंबित करण्यात आले. आता त्या व्यक्तीने हे कारणही घटस्फोटाच्या अर्जात समाविष्ट केले आहे. दुसरीकडे, महिलेने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
पत्नीसोबत फोनवर भांडल्यामुळेच तो व्यक्ती नोकरीवरून निलंबित झाला. पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर महिलेने खोटे आरोप केले आहेत. पत्नीचे सर्व वर्तन हे पतीला मानसिक क्रूरता आहे असे मत व्यक्त करत न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.