
नवी दिल्ली: IIT मध्ये शिक्षण घेऊन पुढे गुगल (Google) सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करायची, हे अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण झालं नाही, तरी निराश न होता, स्वतःचा वेगळा मार्ग तयार करून थेट गुगलकडूनच खास आमंत्रण मिळवलेल्या एका कंटेंट क्रिएटरची गोष्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भविष्य राघव असं या प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरचं नाव आहे. त्याने नुकतेच गुगलच्या ऑफिसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एकेकाळी जिथे पोहोचणं अशक्य वाटत होतं, ते स्वप्न अनपेक्षितपणे कसं पूर्ण झालं, हे त्याने आपल्या पोस्टमध्ये भावूकपणे मांडलं आहे.
शाळेतले दिवस आठवताना राघव म्हणतो, "मी ११ वीत असताना एक मोठं स्वप्न पाहिलं होतं. कुटुंबाच्या इच्छेनुसार खूप अभ्यास करून IIT मध्ये प्रवेश घ्यायचा आणि एक दिवस गुगलमध्ये नोकरी मिळवायची, हेच माझं ध्येय होतं."
पण, त्याने ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. "मला IIT मध्ये प्रवेश मिळू शकला नाही. त्या क्षणी मी गुगलपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न गुपचूप सोडून दिलं. गुगलमध्ये काम करणं कदाचित आपल्याला जमणार नाही, असं मला वाटलं होतं," असं राघवने सांगितलं.
IIT प्रवेश हुकला असला तरी राघव निराश झाला नाही. त्याने कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. सतत नवीन गोष्टी शिकत, मेहनत करत आणि अनेक अडचणींवर मात करत तो कंटेंट बनवत राहिला आणि अखेर नशिबाने त्याला साथ दिली.
तो सांगतो, "आयुष्याने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. मी कंटेंट तयार करायला सुरुवात केली. सतत शिकत, मेहनत करत पुढे गेलो. आणि आज, 'गुगल पिक्सल ११' सिरीजच्या विशेष लाँच कार्यक्रमासाठी गुगलने मला अधिकृतपणे आमंत्रित केलं आहे!"
आपल्या करिअरमधील या अनपेक्षित वळणाबद्दल राघव म्हणतो, "मी विचार केलेल्या पारंपरिक दरवाजातून गुगलमध्ये गेलो नाही. उलट, मी स्वतःसाठी एक पूर्णपणे नवीन दरवाजा तयार केला आणि आत पाऊल टाकलं. कधीकधी स्वप्नं मरत नाहीत, ती फक्त स्वतःसाठी वेगळा मार्ग शोधतात!"
राघवच्या या इन्स्टाग्राम पोस्टने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं अभिनंदन केलं आहे.
एका युजरने कमेंट केली की, "याला म्हणतात आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होणं!"
तर दुसऱ्याने लिहिलं, "स्वप्नं खरंच स्वतःचा वेगळा मार्ग शोधतात."
"IIT ची सीट हुकण्यापासून ते Google कडून VIP आमंत्रण मिळवण्यापर्यंतचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे," अशा शब्दांत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.