पती भारतीय लष्करात मेजर, वडील आणि आजोबाही होते लष्करात, जाणून घ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल

Published : May 07, 2025, 12:19 PM IST
सोफिया कुरेशी

सार

या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारतीय लष्कराची बाजू मांडली.

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला भारताने घेतला आहे. या हल्ल्याला १५ दिवसांनी प्रत्युत्तर देताना, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तरित्या ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. या कारवाईत सुमारे ९० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारतीय लष्कराची बाजू मांडली.

‘सोफिया कुरेशी’ कोण? – नेटिझन्सना पडलेला प्रश्न

या पत्रकार परिषदेतील ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे सोफिया कुरेशी हे नाव देशभर चर्चेत आलं आहे. अनेक जण विचारत आहेत, “ही धाडसी अधिकारी कोण आहेत?”

लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समध्ये अधिकारी आहेत. गुजरातच्या रहिवासी असलेल्या कुरेशी यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सैन्यात दाखल होण्याचं स्वप्न त्यांनी त्यांच्या कुटुंबातील लष्करी वारशामुळे पाहिलं आणि १९९९ मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मधून कमिशन प्राप्त करत त्या लष्करात दाखल झाल्या.

त्यांनी देशातील विविध संवेदनशील आणि आव्हानात्मक भागांमध्ये सेवा बजावली असून, २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या काँगो शांतता मोहिमेतही त्यांनी सहभाग घेतला आहे.

कौटुंबिक लष्करी परंपरा आणि प्रेरणादायी जीवन

सोफिया यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहेत. या दोघांना एक नऊ वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे आजोबा आणि वडीलही सैन्यात कार्यरत होते, त्यामुळे लष्कर हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरला आहे.

मार्च २०१६ मध्ये, त्यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा पार करत बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी होण्याचा मान पटकावला. हा सराव भारतात झाला असून आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सहभाग असलेला कार्यक्रम होता.

‘ऑपरेशन सिंदूर’मागील प्रेरणा, महिला अधिकारी म्हणून त्यांची भूमिका ठळक

देशभरात जेव्हा दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये महिलांच्या सिंदूरावर अप्रत्यक्षपणे आघात केला, तेव्हा त्याच सिंदूरच्या नावावरून सुरू झालेल्या मोहिमेत सोफिया कुरेशी यांचे नेतृत्व आणि भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

त्यांची संयमित परंतु ठाम भूमिका, स्पष्ट संवादशैली आणि निर्णयक्षमतेमुळे त्या नव्या पिढीतील महिला अधिकाऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.

देशाच्या सुरक्षेसाठी उभं राहणाऱ्या अशा धाडसी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची हीच वेळ आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Berlin Marathon: बर्लिन मॅरेथॉनमध्ये चिनी इन्फ्लुएन्सरची चोरी पकडली, सायकलवरून मारली शॉर्टकट!
Morgan Stanley: मॉर्गन स्टॅनलीने MARA, RIOT, GLXY चे टार्गेट घटवले, तरीही १००% पेक्षा जास्त फायद्याची शक्यता