
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण गडद झालं आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत अमेरिकेसह इतर देशांना इशारा दिला की, "काश्मीरच्या मुद्यावर तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची कोणतीही गरज नाही." भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानकडून कब्जा केलेल्या पीओकेवर ठाम भूमिका मांडली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “काश्मीरसंबंधी कोणताही मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाईल. यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही.” त्यांनी पुढे सांगितलं की, पाकिस्तानने भारताच्या भूमीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. पाकिस्तानने पीओके तातडीने रिकामा करावा, ही आमची स्पष्ट मागणी आहे. आम्ही सातत्याने हेच म्हणत आलो आहोत आणि यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करत ठोस प्रत्युत्तर दिलं. 6 मे रोजी भारताने त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर कारवाई करत ती उद्ध्वस्त केली. या पार्श्वभूमीवर रणधीर जयस्वाल म्हणाले. “पाकिस्तानने पुन्हा गोळीबार किंवा हल्ला केल्यास भारत गप्प बसणार नाही. पण जर पाकिस्तान शांत राहिला, तर भारताकडूनही कोणतीही कुरबूर केली जाणार नाही.”
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, भारत आणि पाकिस्तानचे DGMO (Director General of Military Operations) यांच्यात यासंदर्भात संवाद झाला आहे. त्याचबरोबर, "22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी TRF या संघटनेने घेतली आहे, म्हणून TRF ला आंतरराष्ट्रीय घातक दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट करावं," अशी जोरदार मागणीही भारताने मांडली आहे.
भारताने पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. पाकिस्तानने पीओकेमधून माघार घ्यावी आणि दहशतवाद संपवावा, अन्यथा भारताकडून कठोर पावलं उचलली जातील.