
India Census 2027 To Begin In April : देशात जनगणना प्रक्रियेला सुरुवात होत आहे. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच घरे आणि घरांची यादी तयार करण्याची प्रक्रिया यावर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत पार पडेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित केलेल्या ३० दिवसांच्या विशेष कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.
जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा, घरयादी आणि गृहगणना, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान होईल. दुसरा टप्पा, लोकसंख्या गणना, फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. यावेळी लोकांना स्वतः माहिती नोंदवण्याची संधीही मिळणार आहे. घरोघरी जाऊन गणना करण्यापूर्वी नागरिकांना स्वतः माहिती नोंदवण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला जाईल.
ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल. सुमारे ३० लाख कर्मचारी अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल ॲप्लिकेशन्स वापरून माहिती गोळा करतील. यावेळच्या गणनेत जातीय माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गोळा केली जाईल. गेल्या वर्षी ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय घडामोडींवरील मंत्रिमंडळ समितीने जनगणनेत जातीय माहितीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.
१८८१ ते १९३१ दरम्यान ब्रिटिशांनी शेवटची जातनिहाय जनगणना केली होती. स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनेत जातीय माहितीचा समावेश नव्हता. २०२१ मध्ये होणारी ही दशवार्षिक जनगणना कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती.
एकूण लोकसंख्या: १,२१०.१९ दशलक्ष.
पुरुष: ६२३.७२ दशलक्ष (५१.५४%).
महिला: ५८६.४६ दशलक्ष (४८.४६%).