
गोवा फिरायला जाण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण खर्च जास्त होईल या भीतीने अनेकजण प्लॅन पुढे ढकलतात. मात्र योग्य नियोजन केल्यास बंगळुरूहून गोव्याची ट्रिप अगदी बजेटमध्ये होऊ शकते. कमी खर्चात समुद्रकिनारे, निसर्ग आणि मजा अनुभवता येऊ शकते. 3 ते 4 दिवसांच्या ट्रिपसाठी प्रति व्यक्ती साधारण ₹7,500 ते ₹15,000 इतका खर्च येऊ शकतो. यात प्रवास, राहण्याची सोय, खाणेपिणे आणि स्थानिक फिरण्यासाठी वाहनभाडे यांचा समावेश आहे. त्यामुळे कमी बजेट असलेल्यांसाठीही हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.
बंगळुरूहून गोव्याला जाण्यासाठी बस किंवा ट्रेन हा सर्वात स्वस्त पर्याय मानला जातो. प्रवासासाठी ₹1,500 ते ₹3,000 इतका खर्च अपेक्षित आहे. आगाऊ बुकिंग केल्यास आणखी स्वस्त दरात तिकीट मिळू शकते. राहण्यासाठी हॉटेलऐवजी होमस्टे, हॉस्टेल किंवा बजेट गेस्टहाऊस निवडल्यास खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. राहण्यावर ₹2,000 ते ₹5,000 इतका खर्च होऊ शकतो. स्थानिक शॅक्स किंवा छोट्या हॉटेलमध्ये जेवण केल्यास खाण्याचाही खर्च मर्यादित राहतो.
गोव्यात फिरण्यासाठी स्कूटर भाड्याने घेणे हा सर्वात फायदेशीर पर्याय मानला जातो. दिवसाला ₹400 ते ₹600 दरम्यान स्कूटर मिळू शकते. त्यामुळे बीच, किल्ले आणि बाजारपेठा सहज पाहता येतात. कळंगुट, बागा, अंजुना बीच, अग्वाडा किल्ला, चापोरा फोर्ट, पालोलेम बीच आणि दूधसागर धबधबा ही ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीची आहेत. योग्य प्लॅनिंग, ऑफ-सीझनमध्ये प्रवास आणि बजेट पर्याय निवडल्यास गोवा ट्रिप स्वस्तात आणि संस्मरणीय होऊ शकते.